![]()
नागोया, जपान येथे पार पडलेल्या २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली. या स्पर्धेत आर्चरीच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव याने दोन सुवर्णपदके पटकावली. तसेच ऋतुजा पिसाळ हिने हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवत देशाच्या यशात मोलाची भर घातली. मैदानी स्पर्धेतील ४×१०० मीटर रिलेमध्ये सुदेष्णा शिवणकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत चौथा क्रमांक मिळवला. या गुणवंत खेळाडूंच्या यशाचा सातारा जिल्ह्याच्या वतीने भव्य गौरव करण्यात आला. जिल्ह्यातील या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने गौरव रॅली आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत खेळाडूंसह त्यांचे मार्गदर्शक, प्रशिक्षक, पालक, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. गांधी मैदानापासून क्रीडा संकुलापर्यंत उत्साह गौरव रॅलीची सुरुवात गांधी मैदान, राजवाडा येथून झाली. तेथून ही रॅली श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे पोहोचली. रॅलीदरम्यान खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विविध घोषणा, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहपूर्ण वातावरणात खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. रॅलीनंतर झालेल्या सत्कार समारंभात मान्यवरांच्या हस्ते साहिल जाधव, ऋतुजा पिसाळ आणि सुदेष्णा शिवणकर यांचा सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या क्रीडा प्रवासात योगदान देणारे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि पालक यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, कोल्हापूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्यासह अधिकारी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि हजारो नागरिक उपस्थित होते. ‘विद्यार्थ्यांनी आयुष्यात किमान एक तरी खेळ खेळावा’ यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यात किमान एक तरी खेळ खेळला पाहिजे.” आंतरराष्ट्रीय स्तरावर साताऱ्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन करताना त्यांनी खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी भविष्यातही अशाच प्रकारे जिल्ह्याला यश मिळवून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘एआय पदक मिळवून देऊ शकत नाही’ पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबतच खेळाकडेही गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय अनेक गोष्टी करू शकते; मात्र ती खेळातील पदक मिळवून देऊ शकत नाही.” त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाची आवड जपावी, मैदानावर उतरावे आणि खेळाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. साताऱ्यातील या खेळाडूंच्या यशामुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून, त्यांच्या कामगिरीमुळे आगामी काळात अधिकाधिक विद्यार्थी आणि तरुण क्रीडा क्षेत्राकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली
Source link
जपानमध्ये चमकलेल्या साताऱ्याच्या खेळाडूंची भव्य गौरव रॅली:साहिल जाधवला 2 सुवर्ण, ऋतुजा पिसाळला हॉकीत सुवर्ण