![]()
ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांच्या वादातून तरुणाचे मोटारसायकलसह अपहरण करणाऱ्या आठ जणांना उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अपहृत राजेश बाळू चव्हाण यांची 24 तासांच्या आत सुखरूप सुटका केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार, तीन ऑटोरिक्षा आणि चव्हाण यांची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घाटेवस्ती, आंबेठाण येथून तीन रिक्षांमधून आलेल्या संशयितांनी राजेश चव्हाण यांचे अपहरण केले. त्यांची मोटारसायकलही सोबत नेली. याप्रकरणी पत्नी सुषमा राजेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य आणि अपहृत व्यक्तीच्या जिवाला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाला तातडीच्या सूचना दिल्या. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. या तपासातून शिक्रापूर येथे असलेल्या तिघांची माहिती मिळाल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेतले. अमोल रामराव राठोड, सचिन रामराव राठोड आणि निलेश संतोष राठोड यांना शिक्रापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीत ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून हा प्रकार घडल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, संदीप गुलाब राठोड यांचे उचलीचे पैसे राजेश चव्हाण यांनी घेतल्याच्या वादातून आठ जणांनी मिळून त्यांचे अपहरण केले. चौकशीत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील दिंदाळा येथे हालचाली करून उर्वरित आरोपींना ताब्यात घेतले. तेथून राजेश चव्हाण यांची सुखरूप सुटका करण्यात आली. अटक केलेल्या अन्य आरोपींमध्ये शुभम प्रल्हाद जाधव, संदीप गुलाब राठोड, इंदल धावरा जाधव, राजू बाबुराव चव्हाण आणि संदीप उदयभान जाधव यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त सारंग आवाड, उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहायक आयुक्त प्रिया ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी सुर्यवंशी, पोलिस निरीक्षक आणि सहायक निरीक्षक कल्याण घाडगे यांच्यासह तपास पथकाने कारवाईत सहभाग घेतला. आरोपींकडून हस्तगत केलेल्या वाहनांमध्ये ह्युंदाई व्हेन्यू कारचा समावेश आहे. गुन्ह्यात वापरलेल्या तीन ऑटोरिक्षांसह अपहृत व्यक्तीची मोटारसायकलही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे करत आहेत. उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ही माहिती दिली.
Source link
ऊसतोडीच्या उचलीच्या वादातून तरुणाचे अपहरण:उत्तर म्हाळुंगे पोलिसांनी 24 तासांत सुटका करत आठ जणांना अटक केली