Headlines

Fadnavis Targets 70km Mumbai Metro Network Expansion by 2027


राज्यातील मेट्रो आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनासमोर मोठे लक्ष्य ठेवले आहे. 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरवून पुढील वर्षात किमान 70 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका पूर्ण करण्याचे नियोजन करा,

.

मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री वॉर रूमची बैठक झाली. या बैठकीत मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो, उन्नत मार्गिका, रस्ते आणि छत्रपती संभाजीनगरमधील पाणीपुरवठा योजनेसह विविध महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

प्रकल्पांमध्ये यांत्रिकीकरणावर भर

पायाभूत सुविधा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणावर बदल करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. प्रकल्पांवरील किमान 50 टक्के काम यांत्रिकीकरणावर आधारित असावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास यांत्रिकीकरणाचा प्रभावी वापर करून कामाचा वेग वाढवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. निर्धारित कालावधी संपल्यानंतरही कामे अपूर्ण राहिल्यास संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणांना दिले.

जुहू सर्कलजवळ गर्डरचे काम; 12 तासांचा रस्ता ब्लॉक

मेट्रो मार्गिका 2-ब मधील डी. एन. नगर ते चेंबूर मार्गावरील जुहू सर्कल परिसरातील गर्डरचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्यास रविवारी 12 तासांचा विशेष रस्ता ब्लॉक घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, रस्ता ब्लॉक घेण्यापूर्वी कामाची सद्यस्थिती तपासावी आणि त्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा, असे फडणवीस यांनी सांगितले.

या कामामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

शिवडी-वरळी मार्गिका 31 मे 2027 पूर्वी सुरू करण्याचे लक्ष्य

शिवडी ते वरळी उन्नत मार्गिकेची जोडणी 31 मे 2027 पूर्वी पूर्ण करून हा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नवीन रस्ता दुसऱ्या रस्त्याला जोडताना भविष्यात वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही, यासाठी आधीच वाहतूक व्यवस्थापनाचे नियोजन करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

वाकोला जंक्शनवरील वाहतूक कोंडीवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तातडीने उपाय शोधण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्याचबरोबर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीची प्रमुख ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

भूमिगत सुविधांचे ‘मॅपिंग’ करण्याच्या सूचना

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी शहरातील भूमिगत नागरी सुविधांचे अद्ययावत मॅपिंग करण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. पाणी, वीज, गॅस, दूरसंचार यांसारख्या भूमिगत सुविधांची माहिती प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सहज उपलब्ध झाली, तर खोदकामादरम्यान येणाऱ्या अडचणी कमी होतील आणि प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधीही कमी होईल, असे त्यांनी सांगितले.

यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध होईल, अशी प्रभावी यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले.

प्रकल्पस्थळी सुरक्षेवर विशेष लक्ष

पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी नागरिक आणि कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. प्रकल्प परिसरात योग्य मार्गदर्शक फलक, बॅरिकेड्स आणि इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे बंधनकारक करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

प्रकल्पस्थळी सुरक्षा व्यवस्थेसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करून अत्यल्प दरात सुरक्षा सेवा उपलब्ध करून देणारे नवीन व्यवसाय प्रारूप विकसित करण्याची शक्यताही तपासण्याचे निर्देश त्यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगरातील प्रत्येक घराला नळजोडणी

छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. योजना पूर्ण करताना शहरातील प्रत्येक घराला नळजोडणी मिळेल, याची प्रशासनाने खात्री करावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

नळजोडणी देण्यासाठी भविष्यात पुन्हा रस्ते खोदावे लागू नयेत, यासाठी आतापासूनच योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कंत्राटदारांकडून केवळ कामाचा ठरावीक भाग पूर्ण करून न घेता प्रकल्पाचे अंतिम उद्दिष्ट पूर्ण होईल, अशा पद्धतीने काम करून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मेट्रो 6 मधील जमीन आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना

मेट्रो मार्गिका क्रमांक 6 मधील स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मार्गावर जमिनीच्या ताब्याशी संबंधित प्रश्न तसेच न्यायालयीन प्रक्रियेची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रकल्प रखडण्यामागील प्रशासकीय किंवा कायदेशीर अडथळे लवकर दूर करून प्रत्यक्ष कामाला वेग देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

या प्रकल्पांचा घेतला आढावा

मुख्यमंत्री वॉर रूमच्या बैठकीत शिवडी-वरळी उन्नत मार्गिका, मेट्रो मार्गिका क्रमांक 9 (दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर), मेट्रो मार्गिका क्रमांक 5 (ठाणे ते धामणकर नाका आणि कशेळी डेपो), मेट्रो मार्गिका 2-ब (डी. एन. नगर ते डायमंड गार्डन-मंडाले), मेट्रो मार्गिका 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) तसेच छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, अपर मुख्य सचिव (नगर विकास) के. गोविंदराज, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अपर मुख्य सचिव (पाणीपुरवठा) पराग जैन यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा…

‘एका दिवसात महाराष्ट्र बंद नाही केला तर नाव बदलेन’:जरांगे पाटील आक्रमक, पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून सरकारला थेट इशारा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. तसेच सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.