![]()
घरातील किरकोळ वादाचे पर्यवसान थेट मुलीच्या मृत्यूत झाल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील गोडोली येथे घडली. टीव्ही आणि मोबाईल बंद करण्याच्या कारणावरून वडील आणि मुलीमध्ये वाद झाला. या वादातून शिक्षक असलेल्या वडिलांनी बॅटने मारहाण केल्याचा आरोप असून, या मारहाणीत अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी पुरुषोत्तम कदम यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही आणि मोबाईल बंद करण्यास सांगितल्यानंतर वडील आणि मुलीमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर घरातील वातावरण तणावपूर्ण झाले. याचदरम्यान मुलीकडून तिच्या लहान बहिणीलाही मारहाण झाल्याचे आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर आई जखमी मुलीला घेऊन बेडरूममध्ये गेली आणि तिने दरवाजा बंद केला. दरवाजा बंद केल्यानंतर घराच्या दुसऱ्या भागात नेमके काय घडले, याची माहिती आईला मिळाली नाही. पहाटेच्या सुमारास आईला जाग आल्यानंतर मुलगी निपचित अवस्थेत आढळून आली. बॅटने केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आईने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून तपास सुरू केला. त्यानंतर संशयित वडील पुरुषोत्तम कदम यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पुरुषोत्तम कदम यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, मुलीला नेमकी किती वेळ आणि कोणत्या पद्धतीने मारहाण करण्यात आली, तिच्या शरीरावर कोणत्या स्वरूपाच्या दुखापती झाल्या आणि मृत्यूचे नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. उपअधीक्षक विपुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणातील तपासाबाबत माहिती दिली. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. त्यामुळे तपासातून या धक्कादायक घटनेमागील नेमके कारण आणि घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.
Source link
बॅटच्या प्रहारात मुलीचा मृत्यू:शिक्षक वडिलांना अटक, न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलिस कोठडी