Headlines

सतेज पाटलांनी पुणे शिक्षक मतदारसंघात प्रचाराचे रणशिंग फुंकले:आमदार विश्वजीत कदम यांच्यासह शिक्षण संस्थांना भेटी देत साधला संवाद




पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी थेट ॲक्शन मोडमध्ये येत मतदारसंघात जोरदार राजकीय जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे. आमदार पाटील यांनी आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार मोहन जोशी, कॉग्रेसचे पुणे शहराध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या साथीने सोमवार पासून थेट विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. पुण्यातील विविध नामांकित शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांना भेटी देऊन या नेत्यांनी संस्था चालक व व्यवस्थापनाशी थेट संवाद साधला. शिक्षक मतदारसंघात पुणे शहर आणि जिल्ह्यातील संस्थाचालकांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिल्याने आमदार सतेज पाटील आणि आमदार विश्वजीत कदम, यांनी पुण्यातील प्रमुख शिक्षण संस्थांच्या प्रमुखांना वैयक्तिक भेटी देऊन काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठिशी राहण्याचे आवाहन केले. यावेळी जनता शिक्षण संस्थेचे जयप्रकाश जगताप, शाहू कॉलेजच्या प्रमिलाताई गायकवाड व कमलताई व्यवहारे, विलासराव देशमुख लॉ कॉलेजचे डॉ. व्ही. एस. अंकलेकोटे- पाटील, नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे माजी खासदार अशोकराव मोहोळ, शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे आण्णासो थोरात यांच्यासह इतर संस्थाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. संस्था प्रमुखांसोबतच या दोन्ही नेत्यांनी महाविद्यालयांमधील प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांचे, पगाराचे आणि पेन्शनचे प्रलंबित प्रश्न मांडण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केले. यावेळी माजी आमदार उल्हासदादा पवार, रफीक शेख, लहू निवंगुणे, प्रथमेश आबनावे ,भाऊसाहेब आजबे, तौफिक मुल्लाण्णी यांच्यासह कॉग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी अभय छाजेड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी काँग्रेस व महाविकास आघाडीचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदा पुणे शिक्षक मतदारसंघात कोल्हापुरचेच प्रतिस्पर्धी उमेदवार आमनेसामने असल्याने सतेज पाटील यांनी पुण्यातूनच प्रचाराची रणनीती आखल्याचे मानले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *