Headlines

बुलडाण्यात शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी अजित पवार गटात राडा:तुंबळ हाणामारीत दोघांचा मृत्यू, देऊळगाव राजा हादरलं




देऊळगाव राजा शहरात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वादाला सोमवारी रात्री हिंसक वळण लागले. एका कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये झालेल्या वादानंतर जोरदार हाणामारी झाली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये एका नगरसेवकाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर देऊळगाव राजा शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, देऊळगाव राजा परिसरात सोमवारी रात्री कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विविध राजकीय गटांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असतानाच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही नेत्यांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. सुरुवातीला दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, काही वेळातच वाद वाढत गेला आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले. दोन्ही गटांकडून एकमेकांवर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या तुंबळ हाणामारीत काही जण गंभीर जखमी झाले. या घटनेत शिवसेना शिंदे गटाशी संबंधित अनवर शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता आरिफ शेख यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांपैकी एक जण नगरसेवक असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृतांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कव्वालीच्या कार्यक्रमात झालेल्या वादातूनच हा हिंसक संघर्ष झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, वाद नेमका कोणत्या कारणावरून सुरू झाला आणि हाणामारीमध्ये कोणकोणाचा सहभाग होता, याचा तपास पोलीस करत आहेत. दुहेरी मृत्यूच्या या घटनेनंतर देऊळगाव राजा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी सुरू असून, पुढील तपासात या संघर्षामागील संपूर्ण घटनाक्रम आणि जबाबदार व्यक्तींची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *