Headlines

निमगाव खलू येथे वृद्ध दाम्पत्यावर मध्यरात्री हल्ला:पत्नी ठार, पती गंभीर




श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी परिसरातील निमगाव शिवारात वृद्ध दाम्पत्यावर घरात घुसून घातक हत्याराने हल्ला करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल ६ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या हल्ल्यात मंगलबाई शिवाजी भोईटे (वय ६७) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती शिवाजी परशुराम भोईटे (वय ७३) गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मयत मंगलबाई यांचा मुलगा महेंद्र शिवाजी भोईटे (४०, रा. काष्टी) यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निमगाव शिवारातील गट क्रमांक १४५ मध्ये भोईटे कुटुंबाचे दोन मजली घर असून एका मजल्यावर वृद्ध दाम्पत्य, तर वरच्या मजल्यावर त्यांचा मुलगा सुनील कुटुंबासह राहत होता. सोमवारी दुपारी महेंद्र यांना भाऊ सुनील यांनी फोन करून आई-वडील घरात दिसत नसल्याचे सांगितले. महेंद्र यांनी नातेवाईक व शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. त्यावेळी शिवाजी भोईटे रक्तबंबाळ अवस्थेत फरशीवर, तर मंगलबाई बेडरूममध्ये गंभीर जखमी अवस्थेत आढळल्या. दोघांच्या मानेवर गंभीर जखमा झाल्या होत्या. मंगलबाई यांना श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शिवाजी भोईटे यांच्यावर दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फिर्यादीनुसार, मध्यरात्री पाच-सहा जण चोरीच्या उद्देशाने घरात घुसले. कपाटातून तीन तोळ्यांचे मंगळसूत्र, सहा तोळ्यांची मोहनमाळ, तीन सोन्याच्या अंगठ्या व ७० हजार रुपये रोख असा ६ लाख ४५ हजारांचा ऐवज चोरीला गेला. सोमवारी दुपारी घराचा दरवाजा बंद असल्याचे सुनील भोईटे यांच्या लक्षात आले. आई-वडील घरात दिसत नसल्याने त्यांनी महेंद्र यांना फोन केला. घराबाहेर गाई बांधलेल्या असतानाही दरवाजा बंद असल्याने संशय वाढला. नातेवाईक व शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडल्यानंतर वृद्ध दाम्पत्य रक्तबंबाळ अवस्थेत आढळले. त्यानंतर घरातील कपाटांची पाहणी केल्यावर सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *