Headlines

हिंगोलीतील 50 वर्षाची साधना अवघ्या 10 मिनीटात जळून खाक:तंबोरा, हार्मोनियम, तबला, गिटार जळाले; घटनास्थळावरील दृश्य पाहून विद्यार्थ्यांचेही डोळे पाणावले




हिंगोली शहरात मागील 50 वर्षापासून संगीत साधना विद्यालयाच्या माध्यमातून संगीताचे धडे देणाऱ्या विद्यालयातील तंबोरा, हार्मोनियम, तबला, गिटार जळून खाक झाले. मागील 50 वर्षापासूनची संगीत साधना अवघ्या दहा मिनीटात जळून खाक झाली. मंगळवारी (ता. 6) गायनाचे धडे घेणाऱ्या शिष्यांचे घटनास्थळावरील परिस्थिती पाहून डोळे पाणावले. हिंगोली शहरातील कपडा गल्ली भागातील अनुराधा नांदेडकर ह्या संगीत साधना विद्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या शिष्यांना संगिताचे धडे देतात. शास्त्रीय संगीताची आवड असलेल्या अनुराधा नांदेडकर यांनी संपूर्ण मराठवाड्यात हिंगोलीचे नाव गाजवले आहे. त्यानंतर संगीत साधना विद्यालय सुरू करून त्यांनी मागील 50 वर्षात हजारो शिष्य घडविले आहेत. यामध्ये लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत अनेकांनी या विद्यालयात संगिताचे धडे गिरविले आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी न चुकता रियाज विद्यालयात येणाऱ्या शिष्यांना संगिताचे धडे देण्यासोबत अनुराधा नांदेडकर ह्या स्वतः देखील दररोज रियाज करीत. वयाच्या 80 वर्षाच्या कालावधीतही दररोज सकाळी पाच वाजल्या पासून रियाज करण्यास सुरवात करतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा शिष्य परिवार दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने गुरुपूजन उत्सव साजरा करतात. या कार्यक्रमात शास्त्रीय संगीतासोबतच भावगित, भक्तीगीतंची मैफील चांगलीच रंगते. 10 मिनिटांत वाद्ये जळून खाक दरम्यान, सोमवारी (ता. 5) सायंकाळी शिष्यांना संगीताचे धडे दिल्यानंतर रात्रीच्या वेळी अनुराधा नांदेडकर व त्यांच्या स्नुषा श्वेता नांदेडकर घरात काम करीत होत्या. यावेळी अचानक फटाक्यांचे मोठे आवाज होण्यास सुरवात झाली. समोरच्या घराला आग लागल्याचे लक्षात येताच शैलेश यांनी घरात जाऊन दोन्ही महिलांना मागच्या दाराने घराबाहेर काढले. त्यानंतर अवघ्या दहा मिनीटांच्या कालावधीत संपूर्ण घरच आगीच्या भक्षस्थानी सापडले. मागील 50 वर्षापासूनची सुरु असलेली संगीत साधना अवघ्या 10 मिनिटांत जळून खाक झाली. शिष्यांचे डोळे पाणावले दरम्यान, आज सकाळी अनेक शिष्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्या ठिकाणी हार्मोनियम, तंबोरा जळून खाक झाला. तर जळालेल्या तबल्याचे अवशेष दिसून आले. काही कागदपत्रे अर्धवट जळालेली दिसून आली. घटनास्थळावरील परिस्थिती पाहून त्यांच्या शिष्याचे डोळे पाणावल्याचे चित्र पहावयास मिळाले. या घटनेमुळे संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *