Headlines

मालकाची सुपारी दिली, कामगाराला संपवले:पुण्यात जमिनीच्या वादातून मालकाला मारण्यासाठी दिली सुपारी, पाच जणांना अटक




जमिनीच्या वादातून वॉटर प्लांटमालकाचा खून करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली. त्यापैकी दोन लाख रुपये आगाऊही देण्यात आले. मारेकरी प्लांटवर पोहोचले; मात्र, प्लांटमालकाऐवजी त्यांचा कामगार हामजा उस्मान शेख (वय ३९) यांनाच मालक समजून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. यात शेख यांचा मृत्यू झाला. रांजणगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने या सुपारी हत्येचा उलगडा केला असून, पाच जणांना अटक केली आहे. सार्थक संदेश कोहकडे (२४), तुषार अजय तोडकर (२६), संतोष मधुकर मांजरे (३७), विठ्ठल नवनाथ पिकळे (२७) आणि योगेश विलास इडोळे (२८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, पवन सुरेश हुंडारे, पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव याचा पोलीस शोध घेत आहेत. कारेगाव येथील ‘समु इंटरप्रायजेस अॅक्वा रिच’ या पाण्याच्या प्लांटमध्ये २९ सप्टेंबरला हामजा शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांच्या पत्नी अविताबी यांनी रांजणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. तांत्रिक तपासादरम्यान गुन्ह्यातील संशयित संतोष मांजरे हा उत्तर प्रदेशात पळून गेल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने खुनामागील कटाची माहिती दिली. आरोपी सार्थक कोहकडे याचा वॉटर प्लांटमालक विकास नवले यांच्याशी जमिनीवरून वाद होता. त्यातून कोहकडे याने तुषार तोडकरमार्फत संतोष मांजरे याला सुपारी दिली. त्यापैकी दोन लाख रुपये आगाऊ देण्यात आले होते. मांजरे याने पवन सुरेश हुंडारे, पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव, विठ्ठल पिकळे आणि योगेश इडोळे यांच्या मदतीने प्रत्यक्ष खुनाचा कट रचला. त्यानुसार २९ तारखेला मारेकरी प्लांटवर गेले असता त्यांनी हामजा शेख यांनाच विकास नवले समजले आणि त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. या प्रकरणातील पवन हुंडारे आणि पृथ्वी जाधव हे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या पथकाने केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *