![]()
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी साहित्यविश्वात दलित साहित्याला वैचारिक, सामाजिक आणि सौंदर्यशास्त्रीय परिमाण देणारे लेखक, कवी, कादंबरीकार, साहित्य समीक्षक, सरस्वती सन्मानप्राप्त लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे प्रांतपाल रो. नितीन ढमाले आणि संमेलन प्रमुख रो. मधुमिता बर्वे यांनी दिली आहे. संमेलनाचे यंदाचे तिसरे वर्ष असून संमेलन दि. ४ ते दि. ६ डिसेंबर २०२६ या कालावधीत कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जातात. आजच्या संगणक तंत्रस्नेही काळात मराठी वाचन संस्कृतीची अभिवृद्धी व्हावी हा संमेलन आयोजित करण्यामागील हेतू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या संमेलनास रोटेरियन आणि साहित्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ‘अक्करमाशी’ या आत्मकथनाने डॉ. लिंबाळे यांना मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र ओळख मिळवून दिली. ‘द आऊटकास्ट : अक्करमाशी’ या नावाने त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला आणि या साहित्यकृतीचा विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सहभाग झाला आहे. ‘सनातन’, ‘उपल्या’, ‘हिंदू’, ‘रामराज्य’, ‘गावकुसाबाहेरील कथा’, ‘दलित पँथर’, ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ अशा विविध साहित्यकृतींमधून त्यांनी जात, अस्मिता, सामाजिक विषमता, इतिहास आणि माणसाच्या जगण्याचे प्रश्न मांडले आहेत. अनुभवातून आलेले लेखन आणि सामाजिक वास्तवाकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टी ही त्यांच्या साहित्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांची चाळीसपेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून दिलीपराज प्रकाशनतर्फे त्यांचे ‘दलित फाईल्स’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. “४४ प्रकाशित पुस्तकांचा साहित्यप्रवास असलेल्या डॉ. लिंबाळे यांच्या साहित्यकृतींचे हिंदी, इंग्रजीसह मल्याळम, तमिळ, कन्नड, पंजाबी, गुजराती आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. २०११ मध्ये १२व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि २०१९ मध्ये प्रा. रा. ग. जाधव साहित्यसाधना पुरस्कार त्यांना लाभला. तसेच ‘सनातन’ या कादंबरीसाठी २०२० सालचा सरस्वती सन्मान हा त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा गौरव ठरला.
Source link
रोटरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड:पुणे येथे 4 ते 6 डिसेंबर 2026 दरम्यान तिसरे संमेलन होणार