![]()
राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांचे वेध लागले असून, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत आता केवळ राजकीय नेतेच नाही, तर सामाजिक कार्यकर्ते, तरुण उद्योजक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही मैदानात उतरल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी अनोख्या पद्धतीने आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी थेट तिरडीवर जात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच ‘सामान्य लोकांवर ही मरायची वेळ आली आहे, म्हणून चाललो अर्ज भरायला तुमच्यासाठी जिवंत पणे मरायला,’ असे कॅप्शनही त्यांनी लिहिले आहे. रमेश पाटील यांचा तिरडीवर उमेदवारी अर्ज दाखल करायला जतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या अनोख्या पद्धतीने सगळ्यांचेच लक्ष त्यांनी वेधले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी रमेश पाटील यांनी मतदारांना आवाहन देखील केले की, तुम्हाला खरेच मी कामाचा माणूस वाटत असेल तर मला निवडून देण्यास मदत करा, असे त्यांनी म्हटले होते. रमेश पाटील यांचे मतदारांना आवाहन काही दिवसांपूर्वी रमेश पाटील यांनी मतदारांना आवाहन करताना म्हटले होते की, आपल्या सर्वांच्या जीवनात पदवी हे केवळ एक कागदाचे प्रमाणपत्र नाही, तर ती प्रगतीची आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची एक गुरुकिल्ली आहे. मी नेहमीच मानत आलो आहे की, शिक्षण हे आपल्याला विचारांची प्रगल्भता देते आणि जबाबदारीने काम करण्याची ऊर्जा देते. आज मी एका महत्त्वपूर्ण कारणासाठी आपल्या सर्वांसमोर आलो आहे. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही केवळ एक राजकीय लढाई नसून, ती सुशिक्षित समाजाच्या विचारांची आणि अपेक्षांची एक परखड परीक्षा आहे. ‘मी कामाचा माणूस वाटत असेल तर मला साथ द्या’ पुढे त्यांनी म्हटले की, मी आजपर्यंत जे काही काम केले आहे, ते तळमळीने आणि प्रामाणिकपणे केले आहे. विकासाची दृष्टी आणि लोकांची सेवा करण्याची जिद्द माझ्या रक्तात आहे. मला खरोखरच वाटते की, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो, तुमच्या समस्यांना आवाज देऊ शकतो आणि महाराष्ट्राच्या प्रगतीत योगदान देऊ शकतो. जर तुम्हाला माझ्या कामावर विश्वास असेल आणि मी एक ‘कामाचा माणूस’ आहे असे वाटत असेल, तर पदवीधर म्हणून मला तुमची साथ मिळणे ही माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद असेल. माझ्या फेसबुक परिवाराने आणि सर्व फॉलोअर्सनी नेहमीच मला भरभरून प्रेम दिले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, या महत्त्वाच्या प्रवासातही तुमची भक्कम साथ मला लाभेल. चला, एकजुटीने महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सुशिक्षित पदवीधरांच्या हक्कांसाठी एकत्र येऊया, असे म्हणत रमेश पाटील यांनी निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
Source link
'सामान्यांसाठी जिवंतपणी मरण पत्करायला निघालोय':पदवीधरसाठी रमेश पाटलांनी तिरडीवरून जात भरला उमेदवारी अर्ज