Headlines

मुंबईत ड्रग्जचा विळखा!:मैदानात खेळत असलेल्या चिमुकल्याच्या मानेत टोचले नशेचे इंजेक्शन, बर्वेनगरमधील धक्कादायक प्रकार




राज्यात महिला आणि लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, मुंबईत नशेखोर आणि अमली पदार्थांचा विळखा किती गंभीर झाला आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. घाटकोपर परिसरातील बर्वेनगरमध्ये एका 12 वर्षीय विद्यार्थ्याच्या मानेत नशेखोरांनी थेट नशेचे इंजेक्शन टोचल्याचा अत्यंत धक्कादायक आणि भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे ड्रग्जमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, घाटकोपर परिसरात पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यश चौरसिया असे या पीडित विद्यार्थ्याचे नाव असून, तो बर्वेनगरमधील मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 3 मध्ये शिक्षण घेत आहे. शाळेच्या समोरील मैदानात यश आपल्या मित्रांसोबत खेळत होता. त्यावेळी त्याच मैदानात नशा करण्यासाठी बसलेल्या सहा ते सात जणांच्या एका टोळक्यातील काही जणांनी मागून येऊन यशच्या मानेत अचानक इंजेक्शन टोचले. इंजेक्शन टोचल्यानंतर काही वेळातच यशला चक्कर आली, ताप भरला आणि तो तिथेच मैदानावर खाली कोसळला. यश खाली कोसळल्याचे पाहताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. कुटुंबाने धाव घेत त्याला तात्काळ जवळच्या पालिकेच्या मुक्ताबाई रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असून, सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात जाऊन मुलाचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू केले असून, नशेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. मालाडमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू:पाणी मागितले, पण मित्रांनी पाजली दारू; अल्पवयीन मुले ताब्यात राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीचा आणि सेवनाचा विळखा आता सामान्य माणसांच्या दारापर्यंत पोहोचला आहे. याचे विदारक वास्तव दाखवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नुकतीच मुंबईच्या मालाड परिसरात उघडकीस आली आहे. मालाड पूर्वेकडील कुरारच्या आप्पापाडा भागात ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे एका 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने मुंबईत मोठी खळबळ उडवून दिली असून या व्यसनाचे गांभीर्य पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *