![]()
सातारा जिल्ह्यातील गोडोली परिसरात एका जन्मदात्या बापानेच आपल्या मुलीचा खून केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी बाप हा पेशाने शिक्षक असून, शनिवारी रात्री त्याने हे भयंकर कृत्य केले. मुलीची हत्या केल्यानंतर तो प्रचंड गोंधळून गेला होता. या गुन्ह्यातून कसे वाचायचे आणि पुरावे कसे नष्ट करायचे, या विचारात असताना त्याने थेट ‘एआय’ची मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘एआय’ने अशा कृत्यात मदत करण्यास साफ नकार दिला. नेमके काय घडले? हत्येनंतर तब्बल तीन तास तो पुरावे नष्ट करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत होता. शेवटी त्याला हातातील मोबाईल आणि त्यातील ‘एआय’ तंत्रज्ञानाची आठवण झाली. हा खून कसा पचवावा आणि पोलिसांपासून कसे वाचावे, यासाठी त्याने थेट ‘एआय’ची मदत घेण्याचे ठरवले. त्याने मोबाईलवर सर्च करत, “माझ्या हातून नकळत मुलीचा खून झालाय, पुरावे कसे नष्ट करू?” असा प्रश्न विचारला. ‘एआय’ने दिला स्पष्ट नकार आरोपी बापाने जेव्हा एआयला पुरावे नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांना काय उत्तर द्यावे यासाठी मदत मागितली, तेव्हा एआयने त्याला अत्यंत सडेतोड उत्तर दिले. “सॉरी, तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. मी गुन्हेगारीचे समर्थन करणारी कोणतीही माहिती देऊ शकत नाही. सर्वांत आधी पोलिसांना कळवा,” असा स्पष्ट सल्ला एआयने या मारेकरी बापाला दिला. पुरावे नष्ट करण्याचा स्वतःच केला प्रयत्न एआयने साथ देण्यास नकार दिल्यानंतर बापाने स्वतःच खुनाचे पुरावे नष्ट करण्याची धडपड सुरू केली. त्याने अंगावरील रक्ताने माखलेला टीशर्ट काढला आणि तो वॉशिंग मशीनमध्ये तीन वेळा धुतला. घरातील फरशीवर पडलेले रक्ताचे डागही पुसून काढले. कुठेही रक्ताचा अंश राहू नये यासाठी त्याने संपूर्ण घर पाण्याने स्वच्छ धुतले आणि हत्या करण्यासाठी वापरलेली रक्ताने माखलेली बॅट घाईगडबडीत टेरेसवर नेऊन लपवली. पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पुरावे लपवल्यानंतर त्याने पोलिसांना बोलावून एक बनावट कहाणी रचली. घरगुती वादातून मुलीने स्वतःच भिंतीवर डोके आपटून घेतले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला, असा बनाव त्याने रचला. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना त्याचे हे कारण पटले नाही. पोलिसांनी बारकाईने पाहणी केली असता, त्यांना भिंतीवर रक्ताचे उडालेले डाग आणि टेरेसवर लपवून ठेवलेली रक्ताने माखलेली बॅट सापडली. यामुळे पोलिसांचा खुनाचा संशय बळावला. मोबाईल तपासणीतून उलगडा पोलिसांनी पुरावे हाती लागताच आरोपी बापाला तत्काळ बेड्या ठोकल्या. तपासाचा भाग म्हणून जेव्हा त्याचा मोबाईल तपासण्यात आला, तेव्हा त्याने एआयला विचारलेल्या प्रश्नांची धक्कादायक माहिती उघड झाली. आपला बनाव आणि सर्व प्रयत्न फोल ठरल्याचे लक्षात येताच अखेर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. या संपूर्ण तपासात एआयने दाखवलेल्या सद्सद्विवेकबुद्धीला पोलिसांनीही सलाम केला.
Source link
साताऱ्यात बापानेच केला लेकीचा खून:पुरावे नष्ट करण्यासाठी चक्क 'AI'कडे मागितली मदत! गोडोली परिसरातील धक्कादायक घटना