![]()
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर मंगळवारी पहाटे सलग दोन अपघात झाल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली. पहाटे सुमारे तीनच्या सुमारास केळी वाहून नेणारा पिकअप टेम्पो पलटी झाला. त्यानंतर सुमारे पाचच्या सुमारास कंटेनर आणि खासगी बसची धडक झाली. या दुसऱ्या अपघातात बसच्या डाव्या बाजूचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, पाच ते सात प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने दोन्ही अपघातांत जीवितहानी झालेली नाही. बसने कंटेनरला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर मिसिंग लिंकवरील पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तातडीने बंद करण्यात आली. वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक पोलिसांनी वाहने मिसिंग लिंकपूर्वीच्या पर्यायी मार्गाने द्रुतगती महामार्गावर वळवली. अवजड वाहनाला प्रवेशबंदी; तरी कंटेनर आला कसा? या अपघातानंतर गंभीर प्रश्न मिसिंग लिंकवरील वाहतूक नियंत्रण व्यवस्थेवर उपस्थित झाला आहे. या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशाची परवानगी नसताना कंटेनर मिसिंग लिंकवर पोहोचलाच कसा? प्रवेशबंदी असलेल्या मार्गावर अवजड वाहन जाण्यापासून रोखण्याची जबाबदारी कोणाची? प्रवेशाच्या ठिकाणी तपासणी किंवा नियंत्रण यंत्रणा होती का? नियमभंग करून कंटेनर आत आला असल्यास त्याच्यावर कारवाई झाली होती का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, एकाच पहाटे दोन अपघात झाल्याने मिसिंग लिंकवरील सुरक्षा आणि वाहतूक नियोजनही चर्चेत आले आहे. पहिल्या अपघातातील वाहन हटविण्याचे काम सुरू असतानाच दुसरा मोठा अपघात झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. अपघातग्रस्त बस, कंटेनर आणि पिकअप टेम्पो हटविण्याचे काम महामार्ग यंत्रणेकडून सुरू करण्यात आले. मार्ग शक्य तितक्या लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. महामार्ग पोलिसांनी वाहनचालकांना पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, मिसिंग लिंकवर अवजड वाहनाला प्रवेश नेमका कसा मिळाला आणि या नियमभंगासाठी जबाबदार कोण, याची चौकशी होणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.
Source link
मिसिंग लिंकवर अपघातांची मालिका:पिकअप पलटी अन् बस-कंटेनरची धडक, पुणे-मुंबई वाहतूक विस्कळीत