![]()
“राजकारणात राजकीय मतभेद किंवा टोकाचे हेवेदावे असणे समजू शकते; पण राजकीय वैमनस्यातून एखाद्याचे अस्तित्वच कायमचे मिटवून टाकणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत कधीही बसत नाही. ठाण्यातील शिवसेनेचे निष्ठावान विभागप्रमुख प्रदीप (बाळू) पूर्णेकर यांनी दीड महिन्यापूर्वीच आपल्या कुटुंबीयांकडे स्पष्ट शब्दांत भीती व्यक्त केली होती की, ‘माझं जर काही बरं-वाईट झालं, तर त्याला माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे कुटुंबच जबाबदार असेल.’ आज त्यांच्या हत्येनंतर एफआयआर दाखल झाली आहे, काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे; मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई कधी होणार आणि पोलिसांचे आरोपपत्र न्यायालयात कधी सादर होणार?” असा थेट आणि रोखठोक सवाल मुंबईच्या माजी महापौर तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. ठाण्यातील पूर्णेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकर बोलत होत्या. यावेळी माजी महापौर श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, ज्योती भोसले आणि ठाणे जिल्हाप्रमुख खोपकर यांच्यासह मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेच्या प्रमुख महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दीड महिन्यापूर्वीच दिली होती धमकी; कुटुंबाचा संशय थेट माजी महापौरांवर प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाचा दाखला देत पेडणेकर म्हणाल्या, “पूर्णेकर यांच्या पत्नी नंदिनी वहिनी, त्यांची मुलगी (जी व्यावसायिक वैमानिक – पायलट आहे), जावई आणि मुलाशी आम्ही सविस्तर चर्चा केली. दीड महिन्यापूर्वीच प्रदीप दादांनी स्पष्ट सांगितले होते की, क्लस्टर डेव्हलपमेंटमधील गैरप्रकार, जात प्रमाणपत्राचा पाठपुरावा आणि राजकीय वर्चस्वावरून त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. जर त्यांना काही झाले तर ते स्थानिक विभागप्रमुख आणि माजी महापौरांच्या कुटुंबाकडूनच होईल, अशी शंका त्यांनी बोलून दाखवली होती.” रेकी करून पद्धतशीर कट “पूर्णेकर यांच्यावर पाळत (रेकी) ठेवण्यासाठी काही महिला आणि त्यांच्याच काही जवळच्या मित्रांचा वापर करण्यात आला होता. त्यांच्यावर गोळ्या झाडून आणि वार करून अत्यंत क्रूरपणे संपवण्यात आले. रुग्णवाहिकेमध्ये नेतानाही त्यांच्या जवळच्या कोणाला सोबत जाऊ दिले नाही, असा गंभीर संशय कुटुंबाने व्यक्त केला आहे.” एफआयआर झाली, मग आरोपपत्र कधी? तपास यंत्रणांच्या भूमिकेवर बोलताना किशोरी पेडणेकर यांनी पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. “महाराष्ट्र आणि ठाणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आमचा आजही विश्वास आहे. या प्रकरणात तीन महिला आणि काही पुरुषांसह संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, एफआयआरमध्ये माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीचे नाव चर्चेत असताना त्यांना अद्याप चौकशीला बोलावले का नाही? त्यांना नोटीस का बजावली नाही? पोलिसांनी आता राजकीय दबावाला बळी न पडता आपल्या वर्दीचा खरा धाक दाखवला पाहिजे.” आरोपपत्र तातडीने दाखल करा “केवळ संशयितांना पकडून चालणार नाही, तर या हत्येमागे हजारो कोटींचे क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प, जात प्रमाणपत्रातील गैरव्यवहारांचा पाठपुरावा किंवा राजकीय ईर्ष्या यापैकी नेमके काय कारण आहे, याचा मुळापर्यंत तपास झाला पाहिजे. पोलिसांनी लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून पूर्णेकर यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा.” पालकमंत्री सगळीकडे फिरतात, मग पूर्णेकरांच्या दारात का नाही आले? स्थानिक पालकमंत्री आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर पेडणेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “ठाण्याचे पालकमंत्री किरकोळ कार्यक्रमांना आणि राजकीय दौऱ्यांना हजेरी लावतात; मात्र ठाण्याच्या एका ज्येष्ठ आणि हरहुन्नरी सामाजिक कार्यकर्त्याची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या होते, तेव्हा त्यांच्या सांत्वनासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळत नाही. पालकमंत्र्यांचे हे वर्तन अत्यंत वेदनादायी आणि पक्षपाती आहे.” सामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर “ज्या चिंचोळ्या गल्लीत ही गोळीबाराची घटना घडली, तिथे लहान मुले आणि सामान्य नागरिक उपस्थित होते. सुदैवाने इतर अनर्थ टळला; पण पुणे, ठाणे, नाशिक आणि मुंबईत सुरू असलेल्या अशा टोळीयुद्धांमुळे सर्वसामान्य जनता पूर्णपणे भयभीत झाली आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्वतः यात लक्ष घालावे.” जात पडताळणी आणि क्लस्टर प्रकल्पांचा पाठपुरावा भोवला? हत्येमागील संशयित कारणांवर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले, “आमदार भास्कर जाधव यांनीही काल स्पष्ट केले होते की, महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांची जात प्रमाणपत्रे अवैध ठरवली जातात, तर कर्नाटक किंवा परराज्यांतील जात प्रमाणपत्रांना राजकीय सोयीसाठी मान्यता दिली जाते. या बोगस जात प्रमाणपत्रांची कागदपत्रे बाहेर काढण्याचे आणि ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवण्याचे काम प्रदीप पूर्णेकर करत होते. या पाठपुराव्यामुळेच त्यांचा काटा काढण्यात आला का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.” “शिवसेना हे एक कुटुंब आहे. आम्ही नेहमीच आमच्या कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहिलो आहोत. प्रदीप दादांच्या हत्येचा लढा केवळ ठाण्यापुरता मर्यादित नसून, या गुन्ह्यातील शेवटच्या सूत्रधाराला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवेपर्यंत शिवसेना पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील,” असा सज्जड निर्धार किशोरी पेडणेकर यांनी शेवटी व्यक्त केला. ————————————————————– हेही वाचा… पंचनाम्यांच्या नावाखाली क्रूर चेष्टा बंद करा: दुष्काळात शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये सरसकट मदत द्या, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल – मनोज जरांगे “राज्यात यंदा अस्मानी संकटाने थैमान घातले असून शेतात उभा असलेला खरीप पूर्णपणे जळून खाक झाला आहे. मात्र, सरकारचे मंत्री गळ्यात लांबलचक टाय, डोळ्यांवर महागडे चष्मे आणि अत्तराचे घमघमाट मारून दुष्काळी बांधावर येत आहेत. मंत्र्यांचे हे दौरे म्हणजे शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळणे आणि त्यांच्या उरावर नाचण्यासारखे आहे. एका बाजूला शेतकरी उघड्यावर पडलाय आणि दुसऱ्या बाजूला अधिकारी बांधाच्या केवळ अलीकडचा कोपरा जळाला म्हणून तेवढाच पंचनामा करत आहेत. दुष्काळात तुकड्या-तुकड्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांची थट्टा करू नका; हेक्टरी 1 लाख रुपये आणि संपूर्ण सरसकट कर्जमाफी तत्काळ जाहीर करा, अन्यथा एका महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे महाआंदोलन उभे राहील,” असा कडक इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
FIR झाली, मग आरोपपत्र कधी दाखल होणार?:पूर्णेकर हत्याकांडानंतर किशोरी पेडणेकरांचा थेट सवाल; म्हणाल्या- प्रदीप दादांनी दीड महिन्यापूर्वीच व्यक्त केली होती भीती!