Headlines

दुष्काळामुळे ऊसतोड कामगारांवर बेरोजगारीचे संकट:साखर कारखाने 60 दिवस सुरू राहिल्यास पुणे शहरावर ताण, देविदास तुळजापूरकर यांचे मत




यंदा राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, मराठवाड्यातील अनेक कुटुंबांना रोजगार आणि उदरनिर्वाहासाठी पुण्याकडे स्थलांतर करावे लागू शकते. साखर कारखाने यंदा केवळ ६० दिवस सुरू राहिल्यास ऊसतोड कामगारांना मिळणारे १८० दिवसांचे काम मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढण्याबरोबरच पुणे शहरातील पायाभूत सुविधांवरही मोठा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे, असे मत ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ देविदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल, महाराष्ट्र यांच्या वतीने गांधी भवन, कोथरूड येथे महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत ‘फिल्म आणि चर्चा’ या कार्यक्रमात बँकिंग क्षेत्रातील आर्थिक घडामोडींवर आधारित दिग्दर्शक व लेखक वरुण सुखराज यांच्या ‘द ग्रेट इंडियन इल्युजन’ या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या चर्चेत तुळजापूरकर बोलत होते. तुळजापूरकर म्हणाले, बँकिंग क्षेत्रावर देखरेख ठेवणाऱ्या रिझर्व्ह बँकेला पीएमसी बँकेतील घडामोडी वेळीच का समजल्या नाहीत, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. देशाचे बँकिंग क्षेत्र सक्षम असल्याचे सांगितले जात असले तरी जागतिक आर्थिक संकटाची परिस्थिती पाहता त्याचे परिणाम भारताच्या उंबरठ्यावर येण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी आर्थिक घडामोडी आणि बँकिंग व्यवस्थेची माहिती घेऊन आर्थिकदृष्ट्या साक्षर होणे आवश्यक आहे. सरकारची रस्ते आणि रेल्वे यांसारखी पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे सुरक्षित डिजिटल पायाभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. मात्र, विविध शुल्कांच्या माध्यमातून त्याचा आर्थिक भार ग्राहकांवर पडत आहे. सार्वजनिक बँका तोट्यात गेल्यानंतर सरकारकडून त्यांना भांडवल दिले जाते; मात्र त्याचा अप्रत्यक्ष भार नागरिकांवरच पडतो. त्यामुळे जनकेंद्रित बँकिंग धोरणाची गरज आहे. सध्या बँकिंग धोरण कॉर्पोरेट केंद्रित असल्याची टीकाही त्यांनी केली. सोन्यातील गुंतवणूक ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ‘डेड इन्व्हेस्टमेंट’ असल्याचे सांगत तुळजापूरकर म्हणाले, बँकांमधील ठेवी देशाच्या विकासासाठी अधिक महत्त्वाच्या ठरतात. सोन्याच्या किमती भविष्यात अचानक घसरू शकतात. त्यामुळे गुंतवणुकीबाबत नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर म्हणाले, बँकेत नागरिक आपली आयुष्यभराची कमाई ठेवतात. बँक बुडाल्यास त्या पैशांचे काय, हा प्रश्न ‘द ग्रेट इंडियन इल्युजन’ या माहितीपटातून मांडण्यात आला आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेबाबतचे निर्णय केवळ सत्ताधाऱ्यांनी न घेता नागरिकांनीही त्यावर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. व्यवस्थेतील मनमानीला विरोध करून नियमांवर बोट ठेवण्याची भूमिका नागरिकांनी घेतली पाहिजे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *