Headlines

हृदयविकाराचा बनाव करून पतीचा खून:पोलिसांच्या तपासात धक्कादायक सत्य समोर




पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे भासवून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र पोलिसांच्या तपासात हा नैसर्गिक मृत्यू नसून खून असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळापूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी पत्नी, तिचा मुलगा, प्रियकर आणि अन्य साथीदार अशा पाच जणांविरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताचे नाव आप्पासाहेब चव्हाण (वय 52) असे आहे. पोलिसांच्या तपासानुसार, 22 ऑगस्ट रोजी आप्पासाहेब यांना जेवणातून गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर पत्नी सुनीता चव्हाण हिने प्रियकराच्या मदतीने त्यांचा गळा आवळून खून केल्याचा संशय तपासात समोर आला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगून अंत्यसंस्कार आप्पासाहेब यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. त्यानुसार त्यांच्या मृत्यूबाबत कोणालाही संशय येऊ नये, असा बनाव करण्यात आला. त्यानंतर मृतदेहाचा दफनविधीही करण्यात आला. मात्र या मृत्यूबाबत काही संशयास्पद बाबी पोलिसांच्या निदर्शनास आल्या. मृत्यू नैसर्गिक नसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तपासाला वेग या प्रकरणात राजू तानाजी जाधव यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तसेच पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी कुटुंबीय तसेच संशयित व्यक्तींची चौकशी सुरू केली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी खून आणि पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नाचा तपास केला. चौकशीत पत्नी सुनीता चव्हाण हिचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या संबंधातूनच पतीचा काटा काढण्याचा कट रचण्यात आल्याचा संशय तपासात पुढे आला. प्रियकरासह मुलाचाही सहभाग? पतीचा खून केल्यानंतर हा प्रकार नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्यासाठी पत्नी, प्रियकर, मुलगा आणि अन्य साथीदारांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींची भूमिका काय होती, खून नेमका कसा करण्यात आला, तसेच मृत्यूच्या घटनेनंतर कोणत्या पद्धतीने पुरावे नष्ट करण्यात आले, याचा तपास पोलीस करत आहेत. सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या प्रकरणाची माहिती देताना, मृताला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगून दफनविधी करण्यात आला होता. मात्र मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केल्यानंतर खून आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आल्याचे सांगितले. या घटनेमुळे जत तालुक्यात खळबळ उडाली असून, नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवून करण्यात आलेल्या या खुनाचा तपास आता अधिक वेगाने सुरू आहे. हेही वाचा… हिंगोलीतील 50 वर्षाची साधना अवघ्या 10 मिनीटात जळून खाक:तंबोरा, हार्मोनियम, तबला, गिटार जळाले; घटनास्थळावरील दृश्य पाहून विद्यार्थ्यांचेही डोळे पाणावले हिंगोली शहरात मागील 50 वर्षापासून संगीत साधना विद्यालयाच्या माध्यमातून संगीताचे धडे देणाऱ्या विद्यालयातील तंबोरा, हार्मोनियम, तबला, गिटार जळून खाक झाले. मागील 50 वर्षापासूनची संगीत साधना अवघ्या दहा मिनीटात जळून खाक झाली. मंगळवारी (ता. 6) गायनाचे धडे घेणाऱ्या शिष्यांचे घटनास्थळावरील परिस्थिती पाहून डोळे पाणावले. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *