![]()
प्रतिनिधी | पांडे करमाळा-केम ही नियमित एसटी बस शनिवारी सकाळी गुळसडीजवळील पांडओढ्यात कोसळली. बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत चालक व वाहकाला किरकोळ दुखापत झाली आहे. बसला तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे चालकाने सांगितले. करमाळा आगाराची बस (एमएच ११ बीएल ९४२५) सकाळी सातच्या सुमारास करमाळा आगारातून केमकडे निघाली होती. साडेसात वाजेच्या सुमारास गुळसडीजवळील पांडओढा येथे बस चालकाच्या बाजूने रस्त्याच्या कडेला जाऊन ओढ्यात कोसळली. या वेळी बसमध्ये केवळ चालक व वाहक होते. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली. बसमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तांत्रिक तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. करमाळा आगारातील बसच्या वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी करमाळा-कर्जत बस रावगावजवळ पलटी झाल्याची घटना घडली होती. आता करमाळा-केम बस ओढ्यात कोसळल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ओढ्यावर नाहीत संरक्षक कठडे गुळसडी ओढ्यावर संरक्षक कठडे बांधलेले नाहीत. जर संरक्षक कठडे असते तर बस ओढ्यात कोसळली नसती. चालक-वाहकाला दुखापत झाली नसती. संरक्षक कठडे बांधणे आवश्यक आहे. जर कठडे बांधले तर अपघात कमी होण्यास मदत होईल.
Source link
प्रवासी नसलेली करमाळा-केम बस गुळसडी ओढ्यात कोसळली:चालक-वाहक जखमी; गुळसडीजवळ पांडओढ्यात अपघात