![]()
“केंद्रीय निवडणूक आयोग ही संविधानाने निर्माण केलेली निष्पक्ष संस्था न उरता, ती पूर्णपणे भाजप आणि मोदी-शाहांच्या ताटाखालचे मांजर झाली आहे. दिल्लीत पावणेतीनशे खासदारांना संविधानाचा हक्क मागण्यासाठी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना बंदुकांच्या धाकावर रोखण्यात आले. रात्री उशिरापर्यंत महिला खासदारांशी गैरवर्तन झाले आणि राहुल गांधींना रात्री उशिरापर्यंत डांबून ठेवण्यात आले. मात्र, हा लढा आता थांबणारा नसून देशभरात त्याचा भडका उडाला आहे,” असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. दिल्लीतील खासदारांचे आंदोलन, महाराष्ट्रातील भीषण दुष्काळात सरकारकडून होणारी जाहिरातबाजी, एमपीएससी व आदिवासी विद्यार्थ्यांची दडपशाही आणि सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष-चिन्हाबाबत न्यायमूर्तींनी उपस्थित केलेल्या रोखठोक प्रश्नांवर संजय राऊत यांनी केंद्र व राज्य सरकारवर चौफेर तोफ डागली. पावणेतीनशे खासदारांना बंदुका रोखून रोखले; मोदी-शाह कुठे भूमिगत झालेत? दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काढण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या मोर्चावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “पावणेतीनशे खासदारांना निवडणूक आयोगाच्या ‘निर्वाचन सदन’ मुख्यालयाकडे जाताना रस्त्यावर बॅरिकेड्स आणि सशस्त्र दल उभे करून रोखण्यात आले. लोकप्रतिनिधींना मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटू न देणे हे कोणत्या लोकशाहीत बसते? रात्री महिला खासदारांशी पोलिसांनी अत्यंत गैरवर्तन केले आणि रात्री साडेअकरा वाजता राहुल गांधींची सुटका झाली. जगासमोर भारताच्या लोकशाहीची ही विदारक स्थिती समोर गेली आहे.” “ज्ञानेश कुमार आणि मोदी-शाहांच्या संगनमताने हा खेळ सुरू आहे. एवढा मोठा उद्रेक देशात सुरू असताना गृहमंत्री अमित शाह कुठे भूमिगत झाले आहेत आणि पंतप्रधान का मौन बाळगून आहेत? हा लढा आता मागे हटणार नाही; राहुल गांधी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन दिल्लीसह देशभर तीव्र केले जाईल.” दुष्काळी महाराष्ट्रात शेकडो कोटींच्या जाहिराती; चमचेगिरीत तिजोरीची लूट! राज्यातील दुष्काळ आणि सरकारच्या कारभारावर बोलताना त्यांनी ताशेरे ओढले, “पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्षे झाली म्हणून दुष्काळी महाराष्ट्रात शेकडो कोटी रुपयांच्या सरकारी जाहिरातींचे रकानेच्या रकाने छापून आणले जात आहेत. दुष्काळात होरपळणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत देण्याऐवजी जाहिरातींवर 400 ते 500 कोटी रुपये उधळले जात आहेत. हुकूमशहाला चमचेगिरी आवडते आणि सध्या केवळ एकतर्फी लाचारी व चमचेगिरी सुरू आहे.” विद्यार्थ्यांच्या अंगावर लाठ्या; फडणवीसांना आदिवासींच्या घामाचा वास सहन होत नाही का? पुण्यातील स्पर्धा परीक्षांचे आंदोलन आणि मुंबईत आदिवासी विद्यार्थ्यांवर झालेल्या मध्यरात्रीच्या कारवाईवर ते म्हणाले, “नाशिकहून पायी चालत मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सरकारी विश्रामगृह, आमदार निवास किंवा हॉटेल्समध्ये जागा दिली नाही. ते बिचारे विश्वासाने काँग्रेसच्या टिळक भवनात राहिले, तर तिथे पोलिसांनी मध्यरात्री घुसून विद्यार्थिनींना फरफटत बाहेर काढले आणि मुंबईच्या वेशीबाहेर नेऊन सोडले. सरकारला गरीब आदिवासींच्या घामाचा आणि कष्टाचा वास सहन होत नाही का?” एमपीएससी आंदोलनात फूट पाडण्याचा डाव “पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात हजारो एमपीएससी विद्यार्थी ठिय्या मारून बसले आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि विरोधी नेत्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. मात्र, सरकारने चार-पाच लोकांचे गट करून आंदोलनात फूट पाडण्याचा हीन प्रयत्न करण्याऐवजी स्वतः मुख्यमंत्री किंवा उच्च शिक्षणमंत्र्यांनी प्रत्यक्ष पुण्यात जाऊन विद्यार्थ्यांशी सन्मानाने संवाद साधला पाहिजे.” ‘घटनात्मक पाप’ करणाऱ्यांना चिन्ह कसे दिले? न्यायमूर्तींच्या प्रश्नाने बुरखा फाडला! शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वाटपावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा संदर्भ देत राऊत यांनी मोठा मुद्दा मांडला. “सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बागची यांनी अत्यंत गंभीर आणि मूलभूत प्रश्न उपस्थित केला की, ‘ज्यांनी घटनात्मक पाप केले, ज्यांनी पक्षाशी आणि संविधानाशी द्रोह केला, त्यांनाच तुम्ही पक्षचिन्ह देणार का?’ आम्ही तक्रारदार आहोत, उद्धव ठाकरे तक्रारदार आहेत; पण तक्रारदाराची बाजू ऐकण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करणाऱ्या चोरांना घटनात्मक संरक्षण दिले जात आहे का, असा सवाल कोर्टाने उपस्थित केला आहे.” माजी व विद्यमान निवडणूक आयुक्तांवर निशाणा “पक्ष फोडणाऱ्यांना खरी शिवसेना ठरवणे आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल करणे ही परंपरा तत्कालीन आयुक्त राजीव कुमार यांनी सुरू केली आणि ज्ञानेश कुमार ती पुढे चालवत आहेत. राजीव कुमार आणि ज्ञानेश कुमार हे लोकशाहीचे मारेकरी असून संविधानाची हत्या करणाऱ्यांची कोर्ट मार्शलसारखी चौकशी व्हायला हवी. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या युक्तिवादावरून आता सत्य नक्कीच बाहेर येईल आणि धनुष्यबाण हे मूळ शिवसेनेलाच मिळेल,” असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ——————————————————- हेही वाचा… तुझ्या तोंडातला सोन्याचा चमचा शोधतोय: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांसाठी वडील राजेंद्र पवारांचे भावनिक पत्र पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आमदार रोहित पवार गेल्या सहा दिवसांपासून एस. एम. जोशी पुलाजवळ विद्यार्थ्यांसोबत ठिय्या आंदोलन करत आहेत. दिवस-रात्र आंदोलनस्थळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आवाज उठवत असल्याने त्यांच्या आंदोलनाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून त्यांच्या आंदोलनावर टीका होत असतानाच आता रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी मुलाच्या भूमिकेला पाठिंबा देणारे भावनिक पत्र लिहिले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
बंदुकीच्या बळावर पावणेतीनशे खासदारांना रोखणारे आता का लपलेत?:दुष्काळात शेकडो कोटींच्या जाहिरातींची उधळपट्टी; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल