“महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात जवळपास 90 टक्के विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक तोडगा काढलेला आहे. राहिलेल्या काही बाबी घटनात्मक आणि कायद्याच्या चौकटीतील असल्याने त्या नियमानुसा
.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन आता मुंबईच्या दिशेने सरकण्याच्या तयारीत असताना शिक्षणमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांच्या भूमिकेवर तीव्र ताशेरे ओढले. यावेळी त्यांनी एमपीएससी आंदोलन, शिक्षक मतदारसंघातील निवडणुका, आझाद मैदानावरील शाळा बचाव आंदोलन, दुष्काळात सकाळच्या सत्रातील शाळा आणि राहुल गांधींच्या विधानांवर सरकारची सविस्तर भूमिका मांडली.
90 टक्के विषय मार्गी, उर्वरित बाबींसाठी कायदेशीर प्रक्रिया अनिवार्य
एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांच्या मुंबईवारीवर बोलताना दादा भुसे म्हणाले, “स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या अडचणींची राज्य सरकारला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच स्वतः मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे 90 टक्क्यांहून अधिक प्रश्न निकाली काढले आहेत. मात्र, आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्यांविरोधातील कारवाई ही संविधानाच्या कलम 317च्या चौकटीत बसणारी कायदेशीर बाब आहे. त्यासाठी राज्यपालांमार्फत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.”
विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण नको
“कायदा आणि नियमांना बगल देऊन एका रात्रीत निर्णय घेता येत नाहीत. परंतु सर्व गोष्टी सकारात्मक मार्गाने सुरू असतानाही जर विरोधकांना केवळ राजकीय पोळ्या भाजायच्या असतील आणि विद्यार्थ्यांना मुंबईत रस्त्यावर आणून वातावरण तापवायचे असेल, तर हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे.”

महाराष्ट्रातील एकही मराठी शाळा बंद पडू देणार नाही
मुंबईतील आझाद मैदानावर 5 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या शाळा बचाव आंदोलनावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले. “आंदोलक मुंबईत बसल्याची माहिती मिळताच मी पहिल्याच दिवशी त्यांच्या शिष्टमंडळाला बोलावून तब्बल दीड तास सविस्तर चर्चा केली आहे. मी त्यांना निःसंदिग्ध शब्दांत विश्वास दिला आहे की राज्यातील कोणतीही मराठी शाळा शासन बंद पडू देणार नाही.”
पटसंख्या वाढवणे सर्वांची सामूहिक जबाबदारी
“एकीकडे आपण म्हणतो की मराठी शाळांची पटसंख्या घटते आहे आणि दुसरीकडे शाळा बंद पडल्याची भीती व्यक्त केली जाते. मातृभाषेतील शाळा टिकवणे आणि त्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे ही केवळ सरकारचीच नाही, तर संपूर्ण समाजाची आणि शिक्षकांचीही जबाबदारी आहे. दोन्ही बाजूंनी संतुलित विचार होणे गरजेचे आहे.”
दुष्काळात शाळांच्या वेळेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार
राज्यात ऑक्टोबरमध्येच कडक उन्हाच्या झळा आणि तीव्र दुष्काळ जाणवत असल्याने शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याच्या मागणीवर ते म्हणाले, “दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या तापमानाचा विचार करून स्थानिक पातळीवर शाळा सकाळच्या सत्रात सुरू करायच्या की कशा, याचे संपूर्ण अधिकार स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्याची हवामान व भौगोलिक परिस्थिती तपासून जिल्हाधिकारी याबाबत योग्य तो निर्णय घेतील.”
विधान परिषद शिक्षक निवडणूक: “मतदार महायुतीच्या पाठीशी”
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील चुरशीवर शिक्षणमंत्र्यांनी महायुतीच्या विजयाचा दावा केला. “शिक्षकांचे प्रश्न भूतकाळात कोणी सोडवले, सध्या कोण काम करत आहे आणि भविष्यात कोण सोडवू शकते, हे सुजाण शिक्षक मतदारांना चांगले ठाऊक आहे. मतदार राजा नेहमी योग्य निर्णय घेतो आणि महायुतीने शिक्षकांच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळे या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील.”
राहुल गांधींच्या ‘देशद्रोही’ वक्तव्यावर पलटवार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्विटवर विचारले असता भुसे यांनी सुनावले, “देशद्रोही व्यक्ती कोणीही असो, त्याला कायद्यानुसार शिक्षा झालीच पाहिजे, कोणालाही पाठीशी घालता कामा नये. परंतु आपल्या राजकीय विरोधकांना जाणीवपूर्वक मारून-मुटकून ‘देशद्रोही’ ठरवणे हे लोकशाहीच्या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला मुळीच शोभत नाही,” असा टोला शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी लगावला.
————————————————-
हेही वाचा…
बंदुकीच्या बळावर पावणेतीनशे खासदारांना रोखणारे आता का लपलेत?:दुष्काळात शेकडो कोटींच्या जाहिरातींची उधळपट्टी; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

“केंद्रीय निवडणूक आयोग ही संविधानाने निर्माण केलेली निष्पक्ष संस्था न उरता, ती पूर्णपणे भाजप आणि मोदी-शाहांच्या ताटाखालचे मांजर झाली आहे. दिल्लीत पावणेतीनशे खासदारांना संविधानाचा हक्क मागण्यासाठी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना बंदुकांच्या धाकावर रोखण्यात आले. रात्री उशिरापर्यंत महिला खासदारांशी गैरवर्तन झाले आणि राहुल गांधींना रात्री उशिरापर्यंत डांबून ठेवण्यात आले. मात्र, हा लढा आता थांबणारा नसून देशभरात त्याचा भडका उडाला आहे,” असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. येथे वाचा संपूर्ण बातमी