Headlines

जिवंत वृद्धेला मृत दाखवून प्लॉट हडपण्याचा प्रयत्न:बाणेरमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, कुटुंबाच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड




पुण्याच्या बाणेर परिसरात एका जिवंत वृद्ध महिलेला सरकारी कागदपत्रांवर मृत दाखवून तिची जमीन हडपण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुटुंबाच्या सतर्कतेमुळे हा फसवणुकीचा कट वेळेत समोर आला. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृणालीनी संजय निकम यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून सविता दत्तात्रय सोमवंशी, शैलेश राठोड आणि दत्तात्रय संभाजीराव शिंदे यांच्या विरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी मृणालीनी निकम यांचे कुटुंब पाषाण येथील सुस रोड परिसरात राहते. त्यांच्या वडिलांनी १९८८ मध्ये बाणेर येथील सर्वे नंबर ३२/१/१/२० मधील सुमारे ४३० चौरस मीटरचा भूखंड त्यांच्या आईच्या नावावर खरेदी केला होता. या जमिनीवर कुटुंबाचा ताबा असून ते नियमित देखरेख करत होते. एप्रिल २०२४ मध्ये या प्लॉटचा विकास करण्याच्या उद्देशाने कुटुंबाने हालचाली सुरू केल्या. जमिनीच्या व्यवहारासाठी सरकारी पोर्टलवर माहिती तपासली असता, कुटुंबाला मोठा धक्का बसला. जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर आणि सरकारी रेकॉर्डमध्ये त्यांच्या आईच्या नावाऐवजी दुसऱ्याच एका महिलेचे नाव वारस म्हणून नोंदवण्यात आले होते. हा बदल पाहून कुटुंबाने तातडीने संबंधित तहसील कार्यालयात धाव घेतली. तिथे चौकशी केली असता, आरोपींनी जमीन बळकावण्यासाठी मूळ मालक असलेल्या वृद्ध महिला मृत झाल्याचे भासवून त्यांचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र आणि बनावट वारस प्रमाणपत्र तयार केल्याचे उघड झाले. ज्या महिलेला कागदोपत्री मृत दाखवण्यात आले, त्या प्रत्यक्षात जिवंत असून आपल्या कुटुंबासोबत सुखरूप राहत आहेत. आरोपींनी याच बनावट कागदपत्रांच्या आधारे तहसील कार्यालयाची दिशाभूल करून वारस म्हणून स्वतःच्या नावाची नोंद करून घेतली होती. बाणेर पोलीस या कटात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *