![]()
पारनेर शहरात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असताना, दररोज चार लाख लिटर पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर असलेल्या टँकरच्या खेपांमधून प्रत्यक्षात केवळ अडीच लाख लिटर पाणी मिळत असल्याची तक्रार नगराध्यक्षा डॉ.विद्या कावरे आणि पाणीपुरवठा समितीचे सभापती योगेश मते यांनी पारनेर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी प्रियंका शिंदे यांच्याकडे केली आहे.मंजूर पाणीपुरवठा आणि प्रत्यक्ष उपलब्ध होणारे पाणी यामध्ये दीड लाख लिटरची तफावत असल्याने शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या प्रकारामुळे पारनेर नगरपंचायत प्रशासनाची कोंडी झाली असून, संबंधित ठेकेदाराने निर्धारित पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा मुख्याधिकारी प्रियांका शिंदे यांनी दिला आहे. शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायतीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी दररोज चार लाख लिटर पाण्यासाठी टँकरच्या ४० खेपा मंजूर करण्यात आल्या आहेत. मात्र, मंजूर प्रमाणानुसार पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नगरपंचायत पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात अडीच लाख लिटर पाणीच उपलब्ध होत असल्याने उर्वरित दीड लाख लिटर पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे शहरातील सर्व भागांना आवश्यकतेनुसार पाणी पोहोचविताना प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाकडून संबंधित ठेकेदाराला वारंवार सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही अपेक्षित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार आहे. नगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा सभापती यांच्या सूचनांनंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याने या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पाणीटंचाईच्या काळात सुपे औद्योगिक वसाहतीच्या पारनेर शहरासाठी २५ वर्षांपूर्वी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.सध्या ही योजना नादुरुस्त आहे.मात्र सुपे औद्योगिक वसाहतीतून पारनेर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, प्राधान्यक्रमाने टँकर भरून द्यावेत अशी मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. सुपे औद्योगिक वसाहतीतून पाणी उपलब्ध झाल्यास पाणीपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होईल.शहरातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. योग्य पुरवठा न झाल्यास गुन्हा दाखल करणार ^ ठेकेदाराने चार लाख लिटर पाणीपुरवठा करण्यासाठी एक दिवसाची मुदत मागितली आहे. मात्र, या मुदतीत टँकरद्वारे सुरळीत पाणीपुरवठा केला नाही, तर प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने संबंधित ठेकेदारावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. प्रियांका शिंदे, मुख्याधिकारी, पारनेर नगरपंचायत.
Source link
पारनेरात पाणीटंचाई:मंजूर 4 लाख लिटर; प्रत्यक्षामध्ये मिळते अडीच लाख लिटर पाणी, ठेकेदारावर गुन्हा नोंदवण्याचा मुख्याधिकाऱ्यांचा इशारा