![]()
महावितरण कंपनीच्या मनमानी कारभार व अडेलतट्टू धोरणाच्या विरोधात येथील तालुका काँग्रेस कमिटीने महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विपुल भडांगे व तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले. पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्यामुळे आंदोलनाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) कार्यालयासमोर शासन, प्रशासनाविरुद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दोन तास ठिय्या दिला. दरम्यानच्या काळात काही कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. परिणामी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांना शेतात विद्युत कनेक्शन ऐवजी सोलरपंपाचा आग्रह करू नये, शासनाकडे निधीची तरतूद नसेल तर डीडीएफ योजनेअंतर्गत कनेक्शन द्यावे, मोर्शी तालुक्यातील ग्रामीण व शहर भागातील नागरिकांच्या घरावरून गेलेल्या उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांचे स्थानांतर करावे, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवावा, शेतकऱ्यांच्या कृषी पंपावरील विद्युत कनेक्शन दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे बंद करू नये, शेतकऱ्यांची माफ केलेली कृषी पंपाच्या वीजबिलाची रक्कम वजा करावी, शेतकऱ्यांना नियमितरित्या वीज पुरवठा द्यावा. घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर मुळे येत असलेले अव्वाचे सव्वा वीज बिल कमी करावे, आदी मागण्या या वेळी केल्या. महावितरणच्या कार्यालयात प्रवेश करताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी सरकारविरोधात प्रचंड नारेबाजी करून परिसर दणाणून टाकल्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनात विपुल भडांगे व भूषण कोकाटे यांच्यासह नगरसेवक अल्पजा बडासे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष रमा इंगळे, इतर पदाधिकारी पुष्पा परतेती, माजी नगरसेविका सुनीता कुमरे, सेवादलाचे नीलेश तट्टे, वासुदेव तायवाडे, गोलु शेख, मुरलीनाना डहाणे, संजय पांडव, संदीप भदाडे यांनी आदी सहभागी झाले होते. मोर्शी तालुक्यातील दापोरी, डोंगर यावली, घोडदेव, सालबर्डी,हिवरखेड, पिंपळखुटा मोठा परिसरातील कृषी वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांच्या नेतृत्वातही स्वतंत्र ठिय्या आंदोलन केले. डोंगर यावली, पिंपळखुटा मोठा येथील प्रस्तावित सबस्टेशनचे काम ने सुरू करावे, हिवरखेड येथील ३३ केव्ही वीज वितरण केंद्राची क्षमता वाढवावी आणि शेतकऱ्यांना दिवसा १२ तास अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा करावा, अशा मागण्या केल्या. वीज पुरवठ्याच्या अनिश्चिततेमुळे सिंचनाचे नियोजन कोलमडत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे महावितरणने तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणीसुद्धा या वेळी पदाधिकाऱ्यांनी केली. महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय कासट यांना कार्यालयाबाहेर बोलावून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विचारले. दरम्यान कार्यकारी अभियंता यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून लवकरच सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय कासट यांना निवेदन सादर करताना भूषण कोकाटे व पदाधिकारी. दालनाबाहेर येऊन भेटले कार्यकारी अभियंता
Source link
‘महावितरण’चा मनमानीकारभार; काँग्रेस आक्रमक:पदाधिकारी, कार्यकर्ते घुसले कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात