.

अमरावती रविवारी, ११ ऑक्टोबरला शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होत असून, घटस्थापना होणार आहे. या मंगलमय पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चैतन्यमय जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे. जिल्ह्यात सुमारे २,५०० ठिकाणी सार्वजनिकरीत्या दुर्गामातेची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी शहर, ग्रामीण भागात ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, ‘जय माता दी’च्या जयघोषात मानाच्या मंडळांच्या मूर्ती शिल्पकारांकडून त्या-त्या मंडपांकडे रवाना झाल्या. ग्रामदैवत अंबादेवीची यात्रा उद्यापासून सुरू होत आहे. दिवसभरात वेगवेगळ्या मंडळांच्या प्रतिनिधींशी झालेल्या संवादानुसार शहर, ग्रामीण भागातील विविध सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, तरुण मंडळ, महिला बचत गटांद्वारे यंदा दुर्गामातेची प्रतिष्ठापना केली जात आहे. शहरातील श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवी मंदिर परिसरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी घटस्थापना केली जात आहे. शहरात सकाळपासूनच धार्मिक, उत्सवी वातावरण होते. बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांमध्येच देवीच्या स्वागताची उत्सुकता दिसली. सजवलेले ट्रक्स, ट्रॅक्टर, इतर वाहनांतून आकर्षक मूर्तींचे आगमन वाजत-गाजत मार्गस्थ झाले. शहरातील मुख्य रस्ते, चौकांत रंगीबेरंगी रोषणाई, कमानी, भगवे झेंडे लावले आहेत. शहरातील राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इर्विन चौक, अंबागेट परिसर, राजापेठ चौक, गांधी चौक, गाडगेनगर, पंचवटी चौक, कॅम्प रोडवरील प्रमुख चौकांत सायंकाळपासून भाविकांची, कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. मूर्ती नेणाऱ्या वाहनांसोबत तरुणांनी धरलेला ठेका, महिलांच्या उपस्थितीने शहर नवरात्रमय झाले आहे. हे मार्ग असतील बंद : अंबादेवीच्या यात्रेमुळे शनिवार १० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल केला. राजकमल चौकातून अंबागेटकडे जाणारा मार्ग पादचारी पथ असेल. साबनपुरा खिडकी ते गांधी चौक, ओसवाल भवन ते गांधी चौक, भुतेश्वर चौक ते गांधी चौक, मंदिर परिसरातील इतर मुख्य रस्ते सर्व वाहनांसाठी पूर्ण बंद राहतील. टांगापाडाव ते साबनपुरा पोलिस चौकी ते प्रभात चौक या अरुंद रस्त्यावर जड मालवाहतूक वाहनांना प्रवेश बंदी आहे. ^अंबादेवीची यात्रा ही या उत्सवाचा प्रमुख भाग असतो. या दरम्यान राजकमल चौकातून अंबागेटकडे जाताना वाहनांचा वापर करता येत नाही. त्यामुळे नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तंत्रज्ञानाचा वापर करून कडक नजर ठेवली जाणार आहे. गर्दीची संवेदनशील ठिकाणे आणि संमिश्र वस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारले असून, आधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे आकाशातून तांत्रिक देखरेख व पाळत ठेवली जाणार आहे. पोलिसांची विशेष पथके संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. संजय खताळे, सहायक पोलिस आयुक्त, अमरावती. अमरावती ग्रामीण पोलिसांनी हा उत्सव शांततापूर्ण, सुरक्षित व्हावा, म्हणून व्यापक पोलिस बंदोबस्ताचे कडे तयार केले आहे. पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म नियोजन केले आहे. त्यात एसआरपीएफची एक कंपनी, ३ दंगा नियंत्रण पथके, एक जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी), एक अपर पोलिस अधीक्षक, ७ उपविभागीय पोलिस अधिकारी, २० पोलिस निरीक्षक, ११७ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, १७०० पोलिस अंमलदार व ८८० होमगार्डसचा समावेश आहे. याशिवाय वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र २० अंमलदारही तैनात केले आहेत. हे असतील पर्यायी मार्ग : जड व हलकी वाहने सुपर हायवे, जुना बायपास, एमआयडीसी, दस्तुर नगर चौक, राजापेठ-इर्विन उड्डाणपूल या मार्गावरून न्यावी लागेल. अंबादेवी मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी नेहरू मैदान, ओसवाल भवन, मुधोळकर पेठचे मैदान आदी ठिकाणी वाहनतळाची सोय केली. गांधी चौक येथील पार्किंग यात्राकाळात बंद राहील. दरम्यान बंदी आदेशातून रुग्णवाहिका, अग्निशामक दल व इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांना वगळले आहे.