Headlines

आणीबाणी असती तर संजय राऊत तुरुंगात असते की बाहेर?:भारताला बांगलादेश आणि नेपाळ बनवण्याचा 'तुकडे तुकडे गँग'चा डाव! -आमदार नीलेश राणेंची टीका




“केवळ तोंडाने वाफा सोडणे आणि पोकळ भाषणबाजी करणे यापलीकडे ठाकरे गटाकडे काहीही उरलेले नाही. गेल्या 10 वर्षांत त्यांनी केलेल्या निष्क्रियतेमुळे मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला होता. आता महायुती सरकारच्या माध्यमातून कामे मार्गी लागत असल्याने उबाठामधून (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महिन्याला दोन ते तीन मोठे प्रवेश आमच्याकडे होत असून, सरपंच, उपसरपंचांसह संपूर्ण स्थानिक कार्यकारिणी शिवसेना शिंदे गटात दाखल होत आहे. दुसरीकडे देशात आणीबाणीचा कांगावा करणाऱ्या संजय राऊतांना आणीबाणीचा इतिहासच ठाऊक नाही. जर देशात खरी आणीबाणी असती, तर संजय राऊत दररोज सकाळी बाहेर मोकळे फिरून बोल बच्चन करू शकले असते का? ते तुरुंगात असते,” असा थेट आणि बोचरा हल्लाबोल शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी केला आहे. सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नीलेश राणे यांनी कोकणातील पक्षांतराचे वारे, पाणीटंचाईवर प्रशासनाची आगाऊ उपाययोजना, संजय राऊतांचे आणीबाणीवरील दावे आणि दिल्लीतील आंदोलनांच्या नावाखाली देशात अराजकता पसरवण्याच्या कथित षड्यंत्रावर परखड मते मांडली. तोंडाने वाफा सोडणाऱ्यांना जनता विटली ठाकरे सेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणात शिंदे सेनेचे वाढते बळ स्पष्ट करताना आमदार राणे म्हणाले, “मी आमदार नसतानाही आमच्या पक्षात कार्यकर्ते येत होते, मात्र आमदार झाल्यानंतर हा वेग प्रचंड वाढला आहे. गेल्या दहा वर्षांत विरोधकांनी केवळ तोंडाने वाफा सोडल्या, कामे काहीच केली नाहीत. प्रश्न अत्यंत जटील झाले होते. गेल्या दीड-पावणेदोन वर्षांत महायुती सरकारच्या माध्यमातून ते प्रश्न प्रत्यक्ष सुटत आहेत.” गावच्या गावे शिंदे सेनेत “आम्हाला कोणालाही पक्षात येण्यासाठी मनवावे लागत नाही; लोक स्वतःहून विकासकामे पाहून येत आहेत. काम कुठे होते आणि कुठे गेल्यावर आपले प्रश्न सुटतील, हे जनतेला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे महिन्याला दोन ते तीन मोठे प्रवेश होत असून गावच्या गावे, सरपंच, उपसरपंच आणि संपूर्ण कार्यकारिणी आमच्या पक्षात सामील होत आहे. येत्या काळातही हाच ओघ कायम राहील.” टँकर बुकिंगपासून जलस्रोतांचे नियोजन आतापासूनच सुरू हवामान खात्याने पावसाची शक्यता नसल्याचा इशारा दिल्यानंतर निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर त्यांनी प्रशासकीय तयारीचा आढावा दिला. “जिल्ह्यात सध्या 5000 बंधारे बांधून पूर्ण असले तरी केवळ बंधाऱ्यांवर अवलंबून चालणार नाही. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून पाण्याची तीव्रता वाढू शकते, हे गृहीत धरून आम्ही आतापासूनच पाण्याचे नवे स्रोत शोधत आहोत.” वॉटर टँकरचे आगाऊ नियोजन “पाणीटंचाईच्या नियमांनुसार कोणत्या भागात टँकरची गरज भासू शकते, याचे मूल्यांकन करून आतापासूनच वॉटर टँकरचे नियोजन आणि बुकिंग सुरू केले आहे. टंचाईच्या काळात सर्वसामान्य जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना आधीच पूर्ण केल्या आहेत.” संजय राऊत म्हणजे निव्वळ बोल बच्चन संजय राऊत यांनी देशातील स्थितीची तुलना आणीबाणी आणि हिटलरशी केल्याच्या मुद्द्यावर नीलेश राणे यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. “आणीबाणी काय असते हे राऊतांना ठाऊक आहे का? स्वर्गीय इंदिरा गांधींच्या काळात जेव्हा आणीबाणी लागली होती, तेव्हा सर्व विरोधी नेत्यांना जेलमध्ये डांबले होते, वर्तमानपत्रे आणि पत्रकारिता बंद केली होती, मार्शल लॉ लागू केला होता. आज तसे काही झाले आहे का? संजय राऊत फक्त टीव्हीवर बसून बोल बच्चनगिरी करत आहेत.” ठरवून दिलेल्या मतांवर राज्यसभेत जाणारे काय बोलणार? “संजय राऊत काय बोलतात, त्याला कुणीही गांभीर्याने घेत नाही. स्वतःच्या पक्षाचे आमदार ठरवून मतदान करतात म्हणून हा माणूस राज्यसभेत जातो. आयुष्यात जनतेमधून निवडून येऊन कधी नगरसेवक तरी झाला आहे का? आणि हा माणूस 2002 पासून सलग लोकशाही मार्गाने सत्तेत राहणाऱ्या नरेंद्र मोदींवर टीका करतो, याला काही लाज वाटली पाहिजे.” भारताला नेपाळ आणि बांगलादेश बनवण्याचा कट दिल्लीतील सीजेपीचे (CJP) आंदोलन आणि सौरव दास यांच्या विधानांवर सडकून टीका करताना आमदार राणे म्हणाले, “मोदींमुळे देशात युद्धजन्य परिस्थिती आहे, असे आरोप करणाऱ्या या लोकांना भारतामध्ये नेपाळ, बांगलादेश किंवा श्रीलंकेसारखी अशांतता निर्माण करायची आहे. सामान्य जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही; तर काही राजकीय नेते आपले हित साधण्यासाठी हे घडवून आणत आहेत.” विमानात प्रवाशांनी झापले “काल दिल्ली विमानतळावर अभिजीत दिपके विमानातून उतरत असताना सामान्य प्रवाशांनी त्यांना शिव्या घालून खडे बोल सुनावले. हे प्रवासी कोणी भाजप किंवा संघाचे कार्यकर्ते नव्हते, तर सामान्य नागरिक होते. देशातील सामान्य जनता अशा घटकांच्या अजिबात पाठीशी नाही.” ‘तुकडे तुकडे गँग’चे मनसुबे हाणून पाडू “शर्जील इमामसारखे लोक जेव्हा देशाचे तुकडे करण्याची भाषा करत होते, तेव्हा हे लोक मूग गिळून गप्प बसले होते. ही तीच ‘तुकडे तुकडे गँग’ आहे ज्यांना देशाचे विघटन करायचे आहे. मात्र, महायुती आणि देशातील राष्ट्रभक्त नागरिक कोणत्याही परिस्थितीत भारताचा बांगलादेश किंवा नेपाळ होऊ देणार नाहीत,” असा इशारा नीलेश राणे यांनी शेवटी दिला. ————————————————- हेही वाचा… दोन महिन्यांत ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होणार: 11 दिवसांच्या संघर्षानंतर रोहित पवार म्हणाले- हा विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा विजय “विजय विद्यार्थी एकजुटीचा… विजय विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा… आणि चिकाटीचा…” अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी सलग 11 दिवस पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या यशाचे स्वागत केले आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर आणि एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना रजेवर पाठवल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या यशानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, या यशात साथ देणाऱ्या सरकार आणि प्रशासनाचेही आभार मानले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *