![]()
जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ स्वप्न पाहून चालत नाही तर त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्य आवश्यक असते. स्वप्न पाहण्यासाठीही पात्रता लागते आणि ती वाचन, ज्ञान व योग्य विचारांतून निर्माण होते. प्रत्येकाने वाचनाचा छंद जोपासावा, आपल्या क्षेत्राची निवड करून त्यात सातत्य ठेवावे, निर्णयक्षमता वाढवावी आणि वेळेचा सदुपयोग करावा. मोबाइलमध्ये वाया जाणारी ऊर्जा विधायक कामांसाठी वापरावी, असे आवाहन उद्योजक व लेखक शरद तांदळे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने माऊली संकुल येथे उद्योजक व लेखक शरद तांदळे यांच्या ‘स्वप्न ते उद्योजक’ मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तांदळे यांनी उद्योजकता, वाचन, वेळेचे नियोजन, व्यावसायिक ज्ञान, निर्णयक्षमता आणि यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेल्या गुणांवर मार्गदर्शन केले. यावेळी महापौर ज्योती गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, उद्योजक मोहन मानधना, आशिष पोखरणा, ईश्वर बोरा, सुमित सोनवणे उपस्थित होते. तांदळे म्हणाले, आपण जे शिकतो ते योग्य आहे की नाही, याचेही भान ठेवले पाहिजे. प्रत्येकाने वाचनाचा छंद जोपासावा. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, बौद्धिक पातळी उंचावते आणि विचार करण्याची क्षमता वाढते. तरुणांनी योग्य विचार स्वीकारून स्वतःच्या आयुष्याला दिशा द्यावी. आपल्या वारशातून मिळालेल्या विचारांचे महत्त्व समजून घ्यावे. पुस्तकांमधून चांगले विचार मिळतात आणि त्यातून बौद्धिक क्षमता विकसित होते. त्यामुळे प्रत्येकाने वाचनाला आपल्या दैनंदिन जीवनात स्थान दिले पाहिजे. वेळेचा अपव्यय हा यशाच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. ‘टाइमपास’ हा जीवनातील शत्रू असून प्रत्येकाने वेळेचे महत्त्व ओळखले पाहिजे. आपल्या आजूबाजूला चांगले विचार असणाऱ्या व्यक्ती शोधा. केवळ काल्पनिक स्वप्नांच्या दुनियेत न राहता ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कृती करावी. जीवनात आर्थिक स्वावलंबनाला महत्त्व असून त्यासाठी योग्य निर्णय वेळेत घेणे आवश्यक आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते. तरुणांनी मोबाइलचा वापर ज्ञान, कौशल्यविकास आणि आवश्यक कामांसाठी करावा. त्याच्या आहारी जाण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती, वाचन आणि अनुभवातून स्वतःला घडवावे. भविष्यात मोबाइलच्या अतिवापराच्या समस्येवर मात करण्यासाठी स्वतंत्र केंद्रांची गरज भासू शकते, असे मत तांदळे व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योजक आशिष पोखरणा यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर डॉ. सागर बोरुडे यांनी आभार मानले. आजच्या युवकांनी बँकिंगचे ज्ञान मिळवावे व्यवसायात यशस्वी होण्यासाठी केवळ व्यवसायाची कल्पना असून चालत नाही तर त्यासोबत आर्थिक व्यवहारांचे ज्ञानही आवश्यक आहे. उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांनी बँकिंगविषयक माहिती समजून घ्यावी. जीएसटी, आयकर आणि व्यावसायिक आर्थिक व्यवहारांची माहिती करून घ्यावी. व्यवसाय करताना नियोजन, शिस्त आणि सातत्य यांना महत्त्व द्यावे.
Source link
जिद्द, चिकाटी अन् वेळेचे नियोजन हाच यशाचा खरा मार्ग:लेखक शरद तांदळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, मेळाव्याला प्रतिसाद