Headlines

हिंगोलीत वडेट्टीवारांचा सरकारवर चौफेर हल्लाबोल:शेतकरी आत्महत्या, 6 तास लोडशेडिंग अन् शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा




महाराष्ट्र 1972 नंतरच्या सर्वात भीषण दुष्काळी संकटाला सामोरे जात असून, मराठवाड्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तलावांमध्ये पाणी शिल्लक नाही, विहिरी कोरड्या पडल्या आहेत आणि आगामी काळात पिण्याच्या पाण्याचेही मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकारने केवळ शासन निर्णय (GR) काढून शेतकऱ्यांची बोळवण न करता तातडीने हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “1972 च्या दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. मात्र आजचा दुष्काळ त्याहून गंभीर असूनही सरकारकडून अपेक्षित उपाययोजना होताना दिसत नाहीत,” असा आरोप त्यांनी केला. अल निनोच्या संभाव्य परिणामांची माहिती सरकारला आधीपासून होती. तरीही दुष्काळाचा सामना करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी आणि उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, असा दावा त्यांनी केला. 20 दिवसांत 6 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जात असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात मागील 20 दिवसांत 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यामध्ये एका महिला शेतकऱ्याचाही समावेश आहे. महिला शेतकरी आत्महत्या करत आहेत, ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीने ठोस आर्थिक मदत करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीऐवजी कर्जपुनर्गठन; सरकारवर निशाणा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. कर्जपुनर्गठन हा कायमस्वरूपी उपाय नाही. आजचे कर्ज पुढे शेतकऱ्यालाच फेडावे लागणार आहे. त्यामुळे कर्जपुनर्गठन न करता सरसकट 7/12 कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली. “शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना सरकारच्या हाताला लकवा मारतो का? उद्योगपतींची कर्जे माफ होतात, मग कष्टकरी शेतकऱ्याला कर्जमाफी का नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांसोबत लढण्याचा शब्द शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरही वडेट्टीवार यांनी सरकारला लक्ष्य केले. दुष्काळी परिस्थितीत मोठ्या प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च थांबवून तो पैसा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा. शक्तिपीठ महामार्ग रद्द करून त्यासाठीचा निधी शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी वडेट्टीवार यांना चटणी-भाकरी दिली. मंत्र्यांना काजू-बदाम दिले जातात; मात्र शेतकऱ्यांनी दिलेली भाकरी आपण स्वीकारत असल्याचे सांगत वडेट्टीवार यांनी “शक्तिपीठ महामार्गाविरोधात सभागृहात आवाज उठवू आणि रस्त्यावरही आंदोलन उभे करू,” असा शब्द शेतकऱ्यांना दिला. शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना शेतात जाऊ न देता जमिनीची मोजणी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जमीन घेण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. शक्तिपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्याला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. “कुंभमेळ्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे” दुष्काळी संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढायचे असेल तर सरकारने अनावश्यक मोठे प्रकल्प आणि खर्च थांबवून उपलब्ध निधी शेतकऱ्यांसाठी वापरावा, अशी मागणी त्यांनी केली. “कुंभमेळ्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे आहे,” असा टोला त्यांनी सरकारला लगावला. शेतकरी जगला तरच देशाची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत राहील. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. हिंगोलीत 6 तास लोडशेडिंग; सत्ताधारी लोकप्रतिनिधी कुठे? हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या लोडशेडिंगचाही वडेट्टीवार यांनी मुद्दा उपस्थित केला. हिंगोलीत तब्बल 6 तास लोडशेडिंग सुरू असून, यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक त्रस्त आहेत, असा आरोप त्यांनी केला. हिंगोली जिल्ह्यात 6 आमदार आणि 2 खासदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. असे असताना जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी हे लोकप्रतिनिधी काय करत आहेत, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. “हिंगोलीला वाली कोण? जनतेने एकदा या लोकप्रतिनिधींना जाब विचारला पाहिजे,” असे ते म्हणाले. हिंगोली स्फोट दुर्घटनेतील कुटुंबीयांची भेट हिंगोली शहरात झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून, वडेट्टीवार यांनी दुर्घटनेतील जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या दुःखद घटनेबद्दल त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. पीडित कुटुंबांना शासनाकडून आवश्यक ती आर्थिक आणि इतर मदत तातडीने मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. एकीकडे दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणा आणि लोडशेडिंगचे संकट, तर दुसरीकडे शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीचा प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवरून हिंगोली दौऱ्यात वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. हेही वाचा… दुष्काळात शेतकऱ्यांना स्वतःची तिजोरी खुली करणारा महानायक हरपला:स्वतःच्या हव्यासापोटी रोहित पवार ‘मोकाट ढोरां’सारखे सुटलेत! -प्रवीण दरेकर “ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने केवळ मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे कधीही भरून न निघणारे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत मराठी माणसाचा जो स्वाभिमान आणि ताठ कणा होता, तो आज हरपला आहे. दुष्काळात नानांचे मन कधीही स्वस्थ बसू शकले नसते; आजच्या भीषण संकटात त्यांनी शेतकऱ्यांसाठी स्वतःची संपूर्ण तिजोरी खुली केली असती. मात्र, दुर्दैवाने नियतीच्या पुढे नाना हरले,” अशा अत्यंत भावुक शब्दांत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *