पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा तणाव वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली एस. एम. जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या आंदोलनस्थळी पोलिसांनी कारवाईची भूमिका घेतली आहे. पोलीस व्हॅनमधून वारंवार अनाउ
.
हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांची हालचाल
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पुण्यातील वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आंदोलन करण्याच्या अधिकारासोबतच सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास टाळण्याचे निर्देश दिले.
रस्ते, पूल किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, तसेच पुणेकरांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश प्रशासन आणि आंदोलकांना देण्यात आले. या आदेशानंतर पुणे पोलिसांनी आंदोलनस्थळी आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्यास सुरुवात केली आहे.
पोलीस व्हॅनमधून आंदोलकांना जागा खाली करण्याचे आवाहन
आंदोलनस्थळी पोलीस व्हॅनमधून अनाउन्समेंट करून सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा प्रकारचे आंदोलन करू नये, असे सांगण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल किंवा रस्ता अडवला जाईल, अशी कोणतीही कृती केल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात येत आहे.
पोलिसांकडून यापूर्वी आंदोलकांना नोटीसही देण्यात आली होती. त्यानंतर आता प्रत्यक्ष आंदोलनस्थळी पोलिसांकडून अनाउन्समेंट सुरू झाल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.
आंदोलक माघार घेण्यास तयार नाहीत
पोलिसांकडून आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आवाहन होत असले तरी MPSC विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनस्थळी उपस्थित असून, मागण्यांवर ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नसल्याची भूमिका आंदोलकांकडून घेतली जात आहे.
आमदार रोहित पवारही विद्यार्थ्यांसोबत आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना, “तुम्हाला कुणीही उठवू शकत नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
MPSCच्या OMR प्रक्रियेवर रोहित पवारांचा गंभीर आरोप
दरम्यान, रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत MPSCच्या परीक्षेतील OMR प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, OMR शीटवरील ‘Total No. of Questions Attempted’ हा पर्याय मागील दीड वर्षापासून कोणतीही स्पष्ट अधिसूचना न काढता हटवण्यात आला आहे.
या बदलाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. परीक्षेनंतर उमेदवारांच्या OMR शीटमध्ये फेरफार केला जात असल्याचा विद्यार्थ्यांना संशय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवारांनी हा प्रकार पेपरफुटीपेक्षाही गंभीर असल्याचा दावा करत MPSCच्या प्रक्रियेचे स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी केली आहे. तसेच 24 डिसेंबर 2025 रोजी पाचवा पर्याय अनिवार्य करण्यासंदर्भातील निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी किंवा OMR शीटवरील ‘Total No. of Questions Attempted’ हा पर्याय पुन्हा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आंदोलन आणि पोलिसांमध्ये संघर्षाची शक्यता?
एकीकडे न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी पोलिसांकडून सार्वजनिक वाहतूक आणि नागरिकांच्या सोयीचा मुद्दा पुढे केला जात आहे, तर दुसरीकडे MPSC विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे पुण्यातील या आंदोलनाच्या ठिकाणी पुढील काही तास महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून आंदोलनस्थळ रिकामे करण्यासाठी दबाव वाढतो की आंदोलकांना पर्यायी जागा दिली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…
गोळ्या झाडल्यानंतर चॉपरने हल्ला:जिवंत असल्याचे लक्षात येताच पुन्हा सपासप वार, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या हत्येमागील कटाची गंभीरता समोर येत आहे. पूर्णेकर यांच्यावर आधी गोळीबार करण्यात आला. त्यानंतर ते जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर चॉपरने वार केल्याचा धक्कादायक दावा न्यायालयात करण्यात आला. पूर्णेकर कुटुंबीयांच्या वतीने बाजू मांडणारे अॅड. समीर हटले यांनी ठाणे न्यायालयात युक्तिवाद करताना हत्येच्या पद्धतीबाबत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. सविस्तर वाचा….