Headlines

वाचन संस्कृती घराघरांत पोहोचविणे काळाची गरज:उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणेंचे प्रतिपादन; समूह वाचन व ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद




पुस्तके माणसाच्या विचारांना प्रगल्भ करतात. डिजिटल युगात भावी पिढीच्या बौद्धिक विकासासाठी वाचन संस्कृती चळवळीच्या स्वरूपात घराघरांत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे यांनी शुक्रवारी येथे केले. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली आणि स्थानिक वाचन कट्टा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल कॉलनी येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात समूह वाचन व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात अभिजात मराठी भाषेचा गौरव अधोरेखित करणारे दर्जेदार साहित्य, मराठी विश्वकोश, मराठी ग्रंथसूची तसेच विविध संदर्भग्रंथ मांडण्यात आले होते. यानंतर उपस्थित मान्यवर, अधिकारी, शिक्षक आणि वाचनप्रेमींनी सलग अर्धा तास एकाग्रतेने शांततापूर्ण समूह वाचन केले. कार्यक्रमाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी. बी. पुटवाड, शिक्षणाधिकारी (योजना) संदीपकुमार सोनटक्के, महाराष्ट्र साहित्य परिषद, हिंगोली शाखेचे अध्यक्ष अशोक अर्धापूरकर, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, ज्येष्ठ अधिव्याख्याते डॉ. उज्ज्वल करवंदे आणि डॉ. तुकाराम राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी अभिजात मराठी भाषेचा समृद्ध वारसा, ग्रंथालय चळवळीचे योगदान आणि समाजात वाचन संस्कृती रुजविण्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच अवांतर वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये ‘बाल वाचन कट्टा’ सुरू करणे, स्थानिक साहित्यिक आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांना एकत्र आणणे, तसेच नूतन ग्रंथालय अधिकारी कार्यालयाला विचारविनिमयाचे केंद्र बनविणे आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या वेळी वाचन कट्टा समूहातील शिक्षक, साहित्यिक, व्यावसायिक आणि नागरिकांनीही वाचन चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी विविध संकल्पना व सूचना मांडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले. सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक दीपक कोकरे यांनी केले, तर केंद्रप्रमुख विजय बांगर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *