Headlines

Ambadas Danve Slams MPSC Chairman; Criticizes Minister Atul Save


“पुण्यात उन्हातानात बसून नऊ-नऊ दिवस हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे अश्रू समजून घेण्याची संवेदनशीलता या सरकारमध्ये उरलेली नाही. साधी स्कॉलरशिपची परीक्षा नीट घेता येत नाही, आणि वरून भाषणे ठोकतात! आमच्या छत्रपती संभाजीनगरचे अतुल सा

.

पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, गजानन थरकुडे, माजी आमदार गायकवाड, चंदन साळुंके, सचिन चिंचवणे यांच्यासह राज्यभरातून आलेले हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवार उपस्थित होते.

एमपीएससी अध्यक्षांचे नाव भीमनवार नव्हे, ‘दुर्योधनवार’ असावे!

एमपीएससी आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि अध्यक्षांवर जोरदार ताशेरे ओढताना दानवे म्हणाले, “एमपीएससीच्या अध्यक्षांचे नाव विवेक भीमनवार आहे. विवेक नाव कशासाठी लावले हेच कळत नाही; आणि भीमनवार ऐवजी त्यांचे नाव ‘दुर्योधनवार’ असायला हवे होते. महाभारतात भीम न्यायाच्या बाजूने लढला होता; मात्र हा माणूस अन्यायाची पाठराखण करत सरकारच्या इशाऱ्यावर काम करतोय. सरकारची दलाली करणाऱ्या अशा अध्यक्षांची आयोगावरून तत्काळ हकालपट्टी झाली पाहिजे.”

ऐतिहासिक वारशाची आठवण

“याच एमपीएससीचे अध्यक्ष देशाचे सरन्यायाधीश राहिलेले न्यायमूर्ती चंद्रचूड (पिता-पुत्र) आणि न्यायमूर्ती एम. सी. छागला यांच्यासारखे रामशास्त्री बाण्याचे दिग्गज लोक राहिले आहेत. आज मात्र या संस्थेला भ्रष्टाचाराचे कुरण बनवले गेले आहे.”

अतुल सावे केवळ फडणवीसांचे ओएसडी; परीक्षांचे पेपर आधीच फोडले जातात

राज्यातील पेपरफुटीच्या रॅकेटवर बोलताना दानवे यांनी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्यावर थेट हल्ला चढवला. “अतुल सावे म्हणतात आम्ही निर्णय घेऊ. कसले निर्णय घेणार? प्रत्येक गोष्टीसाठी ‘सीएम साहेबांना विचारतो, फडणवीस साहेबांना विचारतो’ एवढेच उत्तर यांच्याकडे असते. स्वतःच्या अधिकारात एका कागदावर सही करण्याची ताकद यांच्यात नाही. हे मंत्री नसून मुख्यमंत्र्यांचे ओएसडी असल्यासारखे वावरतात.”

परीक्षेपासून नोकरीपर्यंत घोळ

“बालवाडी, अंगणवाडीपासून ते थेट एमपीएससी, तलाठी, ग्रामसेवकांपर्यंत सर्वच परीक्षांचे पेपर फुटत आहेत. कालच एका विद्यार्थिनीने सांगितले की, जिचा पेपर होता तिचा नातेवाईक थेट बनावट पोलीस बनून परीक्षा केंद्रात घुसला होता. सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने हा असत्याचा हैदोस महाराष्ट्रात सुरू आहे.”

9 हजारांची नोकरी करून अभ्यास करणाऱ्याचे दुःख फडणवीसांना काय कळणार?

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांच्या संघर्षाची जाणीव करून देताना त्यांनी एक भावनिक प्रसंग सांगितला. “आठ-दहा दिवसांपूर्वी मी परभणीच्या शासकीय विश्रामगृहात नाश्ता करत असताना मला एक तरुण चहा-नाश्ता वाढताना दिसला. मी विचारपूस केली असता, तो औंढ्याचा असल्याचे समजले. तो म्हणाला, ‘वडिलांचे छत्र नाही, घरात फक्त म्हातारी आई आहे; दिवसा 9 हजार रुपयांवर कंत्राटी काम करतो आणि रात्री एमपीएससीचा अभ्यास करतो.’ पाच-पाच, सात-सात वर्षे डोळ्यात तेल घालून राबणाऱ्या अशा गरीब मुलांचा हक्क जेव्हा 25-25 लाख रुपये लाच देणारे दलाल हिरावून घेतात, तेव्हा त्या मुलाच्या काळजाला काय वेदना होत असतील? हे दुःख सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना किंवा फडणवीसांना कधी समजू शकेल का?”

नवरात्रीत लढा प्रत्येक जिल्ह्यात नेणार

आंदोलनाची व्याप्ती राज्यभर वाढवण्याचे आवाहन करताना अंबादास दानवे म्हणाले, “पुणे हे विद्येचे माहेरघर आणि राज्याचे शैक्षणिक केंद्र आहे. जर दोन दिवसांत सरकारने ठोस निर्णय घेऊन अध्यक्षांची हकालपट्टी केली नाही, तर परवापासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर हा लढा आम्ही पुण्यातून बाहेर काढून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जाऊ.”

दुर्गेप्रमाणे अन्यायाचा नायनाट करा

“हा उत्सव शक्ती, ऊर्जा आणि संघर्षाचा आहे. ज्याप्रमाणे दुर्गेने महिषासुराचा वध केला, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेल्या आमच्या भगिनींनी आणि तरुणांनी भ्रष्टाचारी व्यवस्थेचे दुर्योधन रूप धारण केलेल्या राक्षसांचे निर्दालन केले पाहिजे.”

दिल्लीच्या पोलिसांसारखे वागू नका, तुमचेही मुले एमपीएससी करतात!

आंदोलकांना नोटिसा देणाऱ्या आणि कारवाईचा बडगा उगारणाऱ्या पोलिसांनाही दानवे यांनी परखड शब्दांत सुनावले. “आम्ही महाराष्ट्राच्या पोलिसांचा आदर करतो. तुमच्याशी संघर्ष करायचा नाही, कारण तुम्ही आणि आम्ही याच मातीतले आहोत. खाकी वर्दीतल्या पोलिसांची मुलेही याच स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत आणि तुम्हीही एमपीएससीच्या परीक्षेतूनच अधिकारी झाला आहात, हे विसरू नका. दिल्ली पोलिसांसारखी हुकूमशाही महाराष्ट्रात चालणार नाही.”

गुन्ह्यांना घाबरू नका

“हे सरकार औटघटकेचे असून 2029 ची वाट पाहण्याची गरज नाही, लवकरच यांचा पाडाव होईल. विद्यार्थ्यांवर कितीही गुन्हे (FIR) दाखल झाले तरी घाबरू नका. अन्यायाचा कहर झाला की तरुणांनी संघर्षाची तलवार हातात घ्यावीच लागते. विद्यार्थी जिंकल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही,” असा ठाम विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

————————————————

हेही वाचा…

पुण्यात MPSC आंदोलकांवर दुसरा गुन्हा दाखल : विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या शिवराज मोरेंसह 5 जणांवर बडगा

पुण्यातील अलका टॉकीज चौक आणि एस. एम. जोशी पुलावर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनावरून पोलीस प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमधील संघर्ष आता अधिक तीव्र बनला आहे. आंदोलनादरम्यान विनापरवाना ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आता दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ताज्या कारवाईत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह 5 जणांना आरोपी करण्यात आले आहे. यापूर्वीच रस्ता अडवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी 15 प्रमुख आंदोलकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते; त्यात आता ड्रोन प्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्याची भर पडल्याने राजकीय व विद्यार्थी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.