![]()
महिलांच्या आरोग्यामध्ये गर्भाशयाचे मुख म्हणजेच ‘सर्व्हिक्स’ अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, अनेकदा असामान्य स्त्राव, अनियमित रक्तस्त्राव किंवा ओटीपोटात होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष केले जाते. हे दुर्लक्ष ‘सर्व्हिसायटिस’ सारख्या गंभीर आजाराचे निमंत्रण ठरू शकते, असा इशारा प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुजाता उदय राजपूत यांनी दिला आहे. ‘सर्व्हिसायटिस’ म्हणजे काय? सर्व्हिक्स हा योनीमार्गाला गर्भाशयाशी जोडणारा भाग आहे. या भागात संसर्ग, चिडचिड किंवा हार्मोनल बदलांमुळे येणाऱ्या सुजेला ‘सर्व्हिसायटिस’ असे म्हणतात. अस्वच्छता किंवा योनीतील बॅक्टेरियांचे असंतुलन यामुळे ही समस्या उद्भवू शकते. डॉ. राजपूत यांच्या मते, खालील लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे: पिवळसर, हिरवट किंवा दुर्गंधीयुक्त स्त्राव होणे; मासिक पाळीशिवाय किंवा संबंधानंतर रक्तस्त्राव होणे; लघवी करताना जळजळ किंवा ओटीपोटात सतत वेदना होणे; रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्त्राव होणे; सतत पाठदुखी आणि खाज येणे. सर्व्हिसायटिसवर वेळीच उपचार न केल्यास हा संसर्ग गर्भाशय आणि फलोपियन ट्यूब्सपर्यंत पोहोचू शकतो. यामुळे ‘पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज’ (PID) होऊन भविष्यात गर्भधारणेत अडचणी किंवा वंध्यत्वाचा धोका वाढतो. क्लॅमिडिया किंवा गोनोरिया यांसारखे लैंगिक संक्रमित आजार हे देखील याचे मुख्य कारण असू शकतात. नियमित ‘पॅप स्मिअर’ आणि ‘एचपीव्ही’ टेस्ट केल्यास सर्व्हिक्समधील बदल वेळीच ओळखता येतात, ज्यामुळे सर्व्हायकल कॅन्सरचा धोकाही कमी होतो. उपचारांमध्ये प्रामुख्याने अँटिबायोटिक्स आणि अँटीव्हायरल औषधांचा वापर केला जातो. डॉ. राजपूत यांनी आवाहन केले आहे की, “महिलांनी आपल्या प्रजनन आरोग्याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. स्वमर्जीने औषधे न घेता, वैयक्तिक स्वच्छता पाळावी आणि नियमित स्त्रीरोग तपासणी करावी. शरीर देत असलेल्या संकेतांकडे लक्ष दिल्यास भविष्यातील गंभीर समस्या टाळता येतात.”
Source link
'सर्व्हिसायटिस' वंध्यत्वाचे कारण ठरू शकतो:महिलांनी सर्व्हिक्सच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, तज्ज्ञांचा इशारा