महाराष्ट्राच्या समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ या माहितीपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रतिष्ठित ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स
.
पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या या वारीत संतांच्या अभंगांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाचा जयघोष करत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतात. भक्ती, श्रद्धा, समता आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या परंपरेचे वैशिष्ट्य केवळ धार्मिक स्वरूपापुरते मर्यादित नसून, ती महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचेही प्रतीक आहे. हाच समृद्ध वारसा देशाच्या सीमा ओलांडून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली.
22 मिनिटांच्या माहितीपटातून संतपरंपरेचा जागतिक परिचय
‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ हा 22 मिनिटांचा इंग्रजी भाषेतील माहितीपट आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील संतपरंपरेने समाजाला दिलेला भक्ती, मानवता, समता आणि बंधुभावाचा संदेश या माहितीपटाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची वैशिष्ट्ये, वारीचे आध्यात्मिक महत्त्व आणि विठ्ठलभक्तीभोवती एकत्र आलेल्या लाखो वारकऱ्यांची परंपरा यांचा परिचय जागतिक प्रेक्षकांना करून देणे हा या निर्मितीमागील प्रमुख उद्देश आहे. भाषेच्या मर्यादा ओलांडून संतविचारांचा व्यापक प्रसार व्हावा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण व्हावी, या दृष्टीने माहितीपट महत्त्वपूर्ण ठरत आहे. माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या माहितीपटाचे डिस्कवरीच्या जगभरातील विविध वाहिन्यांवर प्रसारण करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे.
‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स’मध्ये भारताचा राष्ट्रीय विजेता
आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील विविध देशांमधून सादर झालेल्या निर्मितींमध्ये ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ या माहितीपटाची भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली. ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ या श्रेणीतील हा बहुमान माहितीपटाच्या आशयाची आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची दखल घेणारा ठरला आहे.
या यशामुळे महाराष्ट्रातील धार्मिक-सांस्कृतिक परंपरा प्रभावी दृक्श्राव्य माध्यमातून जागतिक स्तरावर मांडण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळाले आहे. वारीसारख्या शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सांस्कृतिक सोहळ्याचे आधुनिक माध्यमांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत सादरीकरण करता येते, हे या माहितीपटाने अधोरेखित केले आहे.
‘वारी सर्वांना विठुरायाच्या रंगात रंगवून एकत्र आणते’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या आंतरराष्ट्रीय बहुमानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर वारीच्या समतेच्या आणि एकात्मतेच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, पंढरपूर वारी ही भक्तिमार्गातील अतिशय प्राचीन परंपरा आहे. जात, धर्म, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता ही परंपरा सर्वांना विठुरायाच्या भक्तिरंगात रंगवून एकत्र आणते.
वारीची महान परंपरा, तिच्यामागील उद्देश आणि संतांनी दिलेले विचार जगभरात पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ ही माहितीपट निर्मिती करून प्रदर्शित करण्यात आला. या माहितीपटाला ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026’मध्ये भारतासाठी ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. या यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी यांचे अभिनंदन केले. तसेच, वारीची गौरवशाली परंपरा आणि संतांचे विचार जगासमोर मांडणारा हा माहितीपट सर्वांनी पाहावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ
माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनीही या यशाचे महत्त्व स्पष्ट केले. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील विविध देशांमधून सादर झालेल्या दर्जेदार निर्मितींमधून या माहितीपटाची भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाल्याचे त्यांनी सांगितले.
या बहुमानामुळे महाराष्ट्राची भक्तिपरंपरा, संतसाहित्य, सामाजिक समतेचा संदेश आणि वारीची वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दृक्श्राव्य माध्यमांचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने हा सन्मान महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
संतविचारांचा संदेश जगभर पोहोचविण्याचा प्रयत्न
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि अन्य संतांनी आपल्या अभंग, ओव्या आणि शिकवणीतून समाजाला समता, बंधुभाव, मानवता आणि भक्तीचा मार्ग दाखविला. वारकरी संप्रदायाने या विचारांना दैनंदिन जीवनाशी जोडत समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. पंढरपूर वारी ही या विचारांची प्रत्यक्ष अनुभूती देणारी परंपरा मानली जाते.
या परंपरेचा परिचय इंग्रजी भाषेतील माहितीपटाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर करून देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून झालेली निवड ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची दखल मानली जात आहे. या यशामुळे वारीचे आध्यात्मिक महत्त्व, वारकरी संप्रदायाची सामाजिक भूमिका आणि संतांनी दिलेल्या सार्वकालिक संदेशाला जागतिक स्तरावर अधिक व्यापक व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी घट्ट नाते असलेल्या पंढरपूर वारीला जागतिक प्रेक्षकांसमोर सादर करून तिचा सांस्कृतिक ठेवा अधोरेखित करणाऱ्या या माहितीपटाचा सन्मान राज्यासाठी गौरवाची बाब ठरला आहे.
हेही वाचा….
देशात पुन्हा आणीबाणीसारखी परिस्थिती:लोकशाहीच्या रक्षणासाठी शिवसैनिकांनी सतर्क राहावे – अरविंद सावंत

देशात लोकशाहीसमोर गंभीर आव्हान उभे राहिले असून, दिल्लीतील आंदोलनादरम्यान मेट्रो स्थानके बंद करणे, रस्त्यांवर बॅरिकेडिंग करणे आणि आंदोलकांना अडथळे निर्माण करणे ही आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. लोकशाहीचे रक्षण करणे आणि जनतेच्या मतदानाच्या अधिकारासाठी लढणाऱ्या विरोधी पक्षाला पाठिंबा देणे ही शिवसैनिकांची जबाबदारी आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. सविस्तर वाचा..