![]()
राष्ट्रीय एकात्मता, शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी रविवारी, १ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यात ‘पुणे रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून होणाऱ्या या उपक्रमात ४० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. स्पर्धेसाठी विविध गटांमध्ये एकूण १० लाख रुपयांहून अधिक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय एकात्मतेबरोबरच नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि युवा पिढीला व्यसनमुक्त जीवनशैलीसाठी प्रोत्साहित करणे, हा आयोजनाचा प्रमुख उद्देश आहे. यंदा ‘नशामुक्त युवा–विकसित भारत’ या संकल्पनेवर विशेष भर देण्यात येणार आहे. धावण्याच्या उपक्रमात २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० मैल स्पर्धात्मक धाव, १० किलोमीटर स्पर्धात्मक धाव, पाच किलोमीटर फन रन आणि तीन किलोमीटर फॅमिली व बिगिनर रन अशा पाच गटांचा समावेश आहे. त्यामुळे अनुभवी धावपटूंसह प्रथमच धावणारे नागरिक आणि कुटुंबांनाही सहभागी होता येणार आहे. पात्र महिला व पुरुष धावपटूंना स्पर्धेच्या नियमानुसार पारितोषिके प्रदान केली जातील. देश-विदेशातील नामांकित धावपटूंचाही सहभाग अपेक्षित आहे. गेल्या वर्षी या उपक्रमात २५ हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी १० हजारांहून अधिक धावपटूंनी १० किलोमीटर आणि हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता. यंदा आतापर्यंत २० हजारांहून अधिक नोंदणी प्राप्त झाल्याचे आयोजकांनी सांगितले.मॅरेथॉन मध्ये व्यावसायिक धावपटू, विद्यार्थी, युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, संस्थांचे प्रतिनिधी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. “हा केवळ धावण्याचा उपक्रम नसून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा लोकसहभागाचा उत्सव आहे,” असे मोहोळ यांनी सांगितले. पुणेकरांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. क्रीडा, व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैलीच्या माध्यमातून तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. आरोग्यसंपन्न, शिस्तबद्ध आणि राष्ट्रनिर्माणात सक्रिय योगदान देणारी पिढी घडविण्याचा संदेश या आयोजनातून दिला जाणार आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि व्यसनमुक्तीचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.
Source link
पुण्यात ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन, 40 हजार धावपटू अपेक्षित:केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश