Headlines

उदे गं अंबे उदे…:श्रीकृष्ण-जांबुवंत युद्ध, कोल्हापूरच्या अंबाबाईचे उपपीठ ते महालक्ष्मीचे प्रकटीकरण; जाणून घ्या कडेठाणच्या मंदिराची अनोखी गाथा!




महाराष्ट्रात आदिमायाशक्तीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. त्यातले कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी माता आणि माहूरची (नांदेड) रेणुका माता ही तीन पूर्णपीठे, तर वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी माता अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. अगदी त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या 44 किलोमीटवर असणारी कडेठाणची महालक्ष्मी माता हे कोल्हापूरच्या अंबाबाईचे उपपीठ म्हणून ओळखले जाते. श्रीकृष्णाचे जांबुवंताच्या मुलीसोबत लग्न झाले. त्यानंतर त्यांनी जांबुवंतीसह महालक्ष्मी पूजन केले. त्यासाठीच कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी कटिस्थान अर्थातच आत्ताच्या कडेठाणमध्ये आल्याचे सांगितले जाते. कठेठाणची देवी स्वयंभू आहे. नवरात्रोत्सवाचा आज पहिला दिवस. त्या निमित्त जाणून घेऊयात या देवीची महती आणि अद्भुत आख्यायिका. असे आहे महालक्ष्मीचे मंदिर… कडेठाणच्या महालक्ष्मीचे मंदिर खूप जुने आहे. ते तेराव्या शतकात बांधल्याचे सांगतात. पूर्वाभिमुख दगडी प्रवेशद्वार आहे. द्वारपट्टीवर गणरायाची शेंदुरचर्चित मूर्ती कोरलीय. प्रवेशद्वारावर डाव्या बाजूला गरुड आणि उजव्या बाजूला मारुतीरायाची नमनमुद्रेतली प्रतिमाय. या प्रवेशद्वारातून आत येताच समोर मुख्य मंदिर दिसते आणि आपल्या डोळ्याचे पारणे फिटते. मंदिर परिसरात एक गोलाकार वेदिका आहे. त्यात एक चौकोनी शिळा दिसते. असे म्हणतात की, महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे हे बसण्याचे ठिकाण होते. या मंदिराभोवती कोट बांधलेला आहे. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात भरच पडलेली दिसते. असा आहे महालक्ष्मी मंदिराचा गाभारा… महालक्ष्मी मंदिराची रचना सभामंडप आणि गाभारा अशी आहे. प्रवेशद्वार दगडात बांधले गेलेय. त्यात एक महिरपी कमान असल्याने ते जास्तच वेधक दिसते. या प्रवेशद्वारासमोर होमकुंडय. सभामंडपात प्रवेश करताच दगडी खांब दिसतात. त्यांना कमानीने जोडले आहे. सभामंडपाच्या छतावर एक मोठे गोलाकार फूल कोरल्याचे दिसते. गाभाऱ्याच्या प्रवेश्द्वाराची चौकट दगडी आहे. उंबऱ्यावर कोरलेल्या यक्षमूर्ती दिसतात. जुन्या मंदिरात गाभाऱ्याच्या मधोमध मुख्य गाभारा असतो. तसेच इथेही पाहायला मिळते. असा आहे महालक्ष्मीचा तांदळा… गाभाऱ्यात प्रवेश करतात अतिशय मजबूत अशा दगडी खांबाच्या मधोमध महालक्ष्मीचा तांदळा दिसतो. या तांदळ्यालाच मुख, नेत्र, नासिका आणि नासिकेत घातलेली नथ उठून दिसते. देवीच्या एका बाजूला महाकाली, दुसऱ्या बाजूला महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. त्या सुद्धा तितक्याच विलोभनीय. महालक्ष्मी मंदिरात रोज नित्यपूजा, सकाळ आणि संध्याकाळी आरती होते. नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात कीर्तन, प्रवचन, भारूड, भजन, सप्तशतीपाठ होतात. नऊ दिवस भाविकांची मोठी गर्दी होते. महाराष्ट्रासह तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशातील अनेक कुटुंबांची कडेठाणची महालक्ष्मी कुलदेवता आहे. त्यामुळे या मंदिरात राज्यासह परराज्यांतूनही भाविक दर्शनासाठी येतात. त्यांची स्नान, भोजन ते स्वतंत्र निवास अशी सारी सोय येथे होते. असे आहे कटेश्वराचे पुरातन मंदिर… महालक्ष्मी मंदिराला खेटूनच कटेश्वर महादेवाचे पुरातन मंदिरय. ते सुद्धा दगडात बांधलेले. दगडी खांबांवर साकारलेली लहानच ओवरी, सभामंडप, गाभारा. या मंदिराच्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वारही मोठे सुबकय. दगडी खांबांनी बांधलेले. त्यावर दोन्ही बाजूला उभ्या सर्पाकृती, द्वारपट्टीवर कोरलेले गणराय आणि आत भोळ्या शंकराची पिंड. गाभाऱ्यात एक भुयारी मार्गही दिसतो. मंदिराच्या बाहेरच्या भिंतीला कोनाडे आहेत. त्यात देवी–देवतांच्या पाषाण मूर्ती. शेषशायी विष्णूही आपल्याला इथे भेटतो. कटेश्वराच्या बाजूला दगडी पायऱ्याची बारवही बांधलेली आहे. ही दोन्ही मंदिरे अतिशय पुरातन आणि देखणी अशीच आहेत. भाविकांना येथे बसल्यानंतर एका निरामय शांतीची अनुभूती होते. जांबुवंत होता नाराज… ‘दुर्गा सप्तशती’ ग्रंथात एक उल्लेख येतो, त्यानुसार सृष्टी निर्माणापूर्वी ब्रह्मांडात एक तेजस्वी ऊर्जाशक्ती होती. पुढे तिनेच सगुण साकार रूप धारण केले. तीच जगतजननी महालक्ष्मी. कडेठाणला पूर्वी कटिस्थान म्हटले जायचे. या उपपीठाची आख्यायिका खूप मोठीय. प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला. त्याच्या तावडीतून सीतामाईची मुक्तता केली. सगळीकडे आनंदी आनंद होता. मात्र, या प्रसंगी जांबुवंत नाराज होता. ते मारुतीरायाला कळले. प्रभू रामचंद्राला युद्धाची गळ मारुतीरायाने जांबुवंत नाराज असल्याची माहिती प्रभू रामचंद्रांना सांगितली. प्रभू रामांनी जांबुवंतास नाराजीचे कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला, ‘सर्वांनी युद्ध केले. त्यांना युद्ध करायला योद्धेही मिळाले. मात्र, मला माझ्या कुवतीसारखा बलाढ्य योद्धाच युद्ध करायला मिळाला नाही.’ हे सांगून जांबुवंत थांबला नाही. त्याने प्रभू रामचंद्रांना आपण माझ्याशी युद्ध करावे, अशी गळ घातली. तेव्हा त्यांनी आपण केवळ रावणाचा निप्पात करण्यासाठी युद्ध केले. मात्र, आता ते शक्य नसल्याचे सांगितले. सोबतच जांबुवंताची ही इच्छा पुढच्या कृष्णावतारात पूर्ण करण्याचा वर दिला. सोने देणारा स्यमंतक मणी कृष्णावतारात स्यमंतक नावाचा एक मणी द्वारकेत राहणाऱ्या सत्राजिताकडे होता. सत्राजिताने सूर्यनारायणाचे तप केले. त्यांच्या आशीर्वादाने त्याला हा मणी मिळालेला. या मण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यापासून रोज सोने मिळायचे. असा सोने देणारा मणी असे कसा, याचे कुतूहल श्रीकृष्णाला होते. त्यांना तो मणी पाहायचा होता. त्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली होती. श्रीकृष्णावर आला चोरीचा आळ सत्राजिताने हा मणी त्याचा भाऊ प्रसेनजिताकडे दिला होता. प्रसेनजित एकदा शिकारीस गेला. तेव्हा त्याला एका अस्वलाने ठार केले आणि त्याच्याजवळचा मणी त्या अस्वलाने अस्वलराज जांबुवंताकडे दिला. मात्र, पूर्वी श्रीकृष्णाने हा मणी पाहायची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्याने प्रसेनजिताला ठार केले आणि मणी चोरला असा आळ त्याच्यावर आला. जामखेड येथे जांबुवंत-कृष्ण युद्ध श्रीकृष्णाला आपल्यावर आलेला चोरीचा आळ पुसून काढायचा होता. त्यासाठी तो स्यमंतक मण्याच्या शोधासाठी निघाले. ते जांबुवंताच्या गुहेपर्यंत पोहचले. ही गुहा म्हणजे सध्याच्या कडेठाणपासून जवळ असणाऱ्या जामखेड येथील गुहा. येथेच श्रीकृष्ण आणि जांबुवंताचे घनघोर युद्ध झाले. रामाच्या अवतारात दिले दर्शन असे म्हणतात की, जांबुवंत आणि कृष्णाचे युद्ध जवळपास एकवीस दिवस चालले. त्यात अखेर जांबुवंताचा पराभव झाला. तेव्हा तो म्हणाला, ‘माझे प्रभू रामचंद्र माझ्याजवळ असते, तर मी आज हरलोच नसतो.’ हे ऐकताच श्रीकृष्णाने जांबुवंताला प्रभू रामचंद्राच्या अवतारात दर्शन दिले. आणि प्रभू रामचंद्राचा तो जांबुवंताला लढण्यासाठी दिलेला वरही पूर्ण केला. करवीर निवासिनी कडेठाणमध्ये आली… जांबुवंत आणि श्रीकृष्णाचे युद्ध झाले. प्रभू रामचंद्राने जांबुवंताला दर्शन दिले. सोबतच कन्या जांबुवंतीचे लग्न श्रीकृष्णासोबत लावून देण्याची सूचनाही केली. त्यानुसार श्रीकृष्ण आणि जांबुवंतीचे लग्न धूमधडाक्यात झाले. या लग्नानंतर श्रीकृष्णाने जांबुवंतीसह महालक्ष्मी पूजन केले. त्यासाठीच कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी कटिस्थान येथे प्रकट झाली. तेव्हापासून हे करवीर निवासिनीचे उपपीठ म्हणून ओळखले जाते. या आख्यायिकेची खूण म्हणून महालक्ष्मी मंदिराच्या मागील बाजूस कोरलेली श्रीकृष्णाची मूर्ती असल्याचे सांगितले जाते. श्री चक्रधर स्वामींचे मंदिरात वास्तव्य… महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनीही कडेठाणमध्ये वास्तव्य केले आहे. त्याचा उल्लेखही महानुभावांच्या प्राचीन ग्रंथात आला आहे. ‘लीळाचरित्रा’मध्ये ‘कडेठणीं माहलखूमीए वस्ति’ अशी लीळा आहे. चक्रधर स्वामींच्या चरित्रानुसार त्यांनी अनेक यात्रा केल्या. सुरुवातीला काही काळ ते पैठणजवळ दहाएक महिने राहिले. त्यानंतर गोविंदप्रभूंना भेटण्यासाठी रितपूरला गेले. त्यांचा जाण्याचा आणि येण्याचा मार्ग हा राहाटगाव, कडेठाण, सेंदुर्जन, आलेगाव,पातुरडी, सिंगणापूर, खोलापूर, खैराळा असा एकच होता. या प्रवासात त्यांचा कडेठाणमध्ये मुक्काम होता. महानुभावांच्या ग्रंथात सुद्धा उल्लेख… श्री चक्रधर स्वामींच्या या वास्तव्याचा महानुभावांच्या ग्रंथात हा सुद्धा उल्लेख आला आहे. तो असा, ‘उदीयांचि गोसावीं कडेठणासि बीजें केलें : मार्गी आसन जालें : गोसावीं बाइसांकरवि सीळिका आणवीलीया :’ याच लीळेचा एक पाठभेद असा आहे की ‘गावां आग्न कोणीं मळा : तेथ वृक्षा एका तळीं गोसावीयांसि आसन जालें : तेथचि दुपाहाराची आरोगण जाली… पहुडु जाला : उपहुडु होउनि मग गावांआंतु महालक्ष्मीए वस्ति जाली :’ श्री चक्रधर स्वामींनी महालक्ष्मी मंदिरात जिथे बैठक मांडली होती, ते स्थळ आजही जतन करून ठेवण्यात आले आहे. तेथे पादुकांची स्थापना करण्यात आलीय. मंदिर आवारात याच वर्तुळाकार स्थळाच्या दोन्ही बाजूंस उंच दगडी दीपमाळा आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *