![]()
महाराष्ट्रातून मान्सूनने ८ ऑक्टोबर रोजी माघार घेतली. ऑगस्टच्या सुरुवातीपासून पडलेल्या खंडामुळे महाराष्ट्र तीव्र दुष्काळाच्या खाईत लोटला गेला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार, महाराष्ट्रात ३० सप्टेंबरपर्यंत ८०४.४ मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या ५ वर्षांतील पावसाचे हे सर्वात कमी प्रमाण आहे. राज्यात यंदा १९ टक्के कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंतच्या नोंदीनुसार यंदा केवळ ४० तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ४१ तालुक्यांत २५ ते ५० टक्क्यांदरम्यान, तर १६७ तालुक्यांत ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे, राज्यातील धरणांतील जलसाठ्यात भरपावसाळ्यात घट होऊ लागली असून, गेल्या २५ दिवसांत उपयुक्त जलसाठा तब्बल १३३६.८ दशलक्ष घनमीटरने (३.२७ टक्के) घटला, ही चिंतेची बाब आहे. १३३६.८ दशलक्ष घनमीटर पाणी घटले धरणांमधून शहरांसह उद्योग, शेतीला पाणी पुरवले जाते. गेल्या २५ दिवसांत राज्यातील धरणांतील उपयुक्त जलसाठ्यात १३३६.८ दशलक्ष घनमीटरची (३.२७%) घट झाली आहे. विशेष म्हणजे याच कालावधीत गेल्या वर्षी जलसाठ्यात १४८७.६७ दशलक्ष घनमीटरची (३.६७%) भर पडली होती. ऑक्टोबर कोरडा, सप्टेंबरमध्ये ५२ टक्के तूट महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस होतो. त्याचा खरिपाला लाभ होतो. धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ होते. या वर्षी मात्र ऑक्टोबर महिना कोरडा केला आहे. १ ते १० ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात ३८.४ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार, या कालावधीत महाराष्ट्रात केवळ ०.९ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण – ९८ टक्के आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यात १८०.७ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात केवळ ८७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. हे प्रमाण सरासरीच्या तुलनेत ४८ टक्के असून पावसात ५२ टक्के तूट आहे. फळबागा जगवण्याचे आव्हान दुष्काळामुळे फळबागा जगवणे हे मोठे संकट निर्माण झाले आहे. जनावरांना पाणी आणि चारा उपलब्ध करून देणे हे सरकारसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. रब्बी हंगामाची आता शक्यता उरलेली नाही. त्यामुळे १०-१५ वर्षांपासून शेतकऱ्यांनी उभारलेल्या फळबागा वाचवणे आणि फलोत्पादन क्षमता जपण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.- डॉ. भगवान कापसे, कृषी तज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर
Source link
मान्सून संपला:महाराष्ट्रात या वर्षी 5 वर्षांतील सर्वात कमी पाऊस; 19% तूट, 208 तालुक्यांत 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस