![]()
दुर्गा उत्सव दसरा व दिवाळी हे सण सामाजिक सलोखा, शांततेच्या वातावरणात साजरे करावे. सर्व दुर्गा उत्सव मंडळांनी सामाजिक जबाबदारी जपत पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी केले. परशुराम मंगल कार्यालय येथे आयोजित शांतता कमिटीच्या सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने यांनी भूषवले. मार्गदर्शक म्हणून अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक निकेतन कदम, प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार सागर ढवळे, मुख्याधिकारी पराग वानखडे, नगरपालिकेचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश पाटील, ठाणेदार राहुल आठवले, शिरखेडचे ठाणेदार ईश्वर वर्गे उपस्थित होते.गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही ठिकाणी अश्लील प्रकार आढळल्याचे सांगत अशा घटनेबाबत बाल हक्क आयोग व महिला हक्क आयोगाकडून प्रशासनाला विचारणा होते. त्यामुळे मंडळांनी उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले. नशामुक्तीसाठी जनजागृती करणारे पोस्टर देणार असून, ते ऑपरेशन कवच अंतर्गत सर्व उत्सव मंडळांना भाविकांना सहज दिसतील व वाचता येतील, अशा दर्शनीय भागात लावावे, असेही त्यांनी सांगितले. दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने निबंध स्पर्धा,अमली पदार्थावर जनजागृती, व्यसनमुक्ती असे विविध सामाजिक कार्यक्रम राबवून हा उत्सव साजरा करावा. शांतता समितीच्या बैठकीला मोर्शी व शिरखेड पोलिस ठाण्यांच्या हद्दीमधील दुर्गा व शारदा मंडळांचे पुरुष व महिला, आजी-माजी नगरसेवक, पत्रकार,पोलिस पाटील, मॉर्निंग फिटनेस ग्रुपचे सदस्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार राहुल आठवले यांनी केले. संचालन प्रवीण चौधरी यांनी केले. आभार उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश पाटील यांनी मानले.
Source link
सामाजिक सलोखा; सण शांततेत साजरे करा- कदम:परशुराम मंगल कार्यालयात कमिटीची सभा