Headlines

सव्वा दोन कोटींच्या सोनेचोरीचा 12 तासांत छडा:खडक पोलिसांनी काका-पुतण्याला अटक करत 2 किलो 200 ग्रॅम सोने जप्त केले




रविवार पेठेतील घरातून तब्बल २ कोटी २० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे चोरणाऱ्या दोन संशयितांना खडक पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. आरोपींकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालासह अतिरिक्त ४६ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २ कोटी २४ लाख ६६२ रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुस्तफा नजीर शेख (वय ३६) आणि सरफराज ऊर्फ आवेज शेख (वय २२, दोघेही रा. रविवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघे नात्याने काका-पुतणे असून, तक्रारदार राहत असलेल्या इमारतीतच त्यांचे वास्तव्य असल्याचे तपासात समोर आले. तक्रारदार मोहम्मद तौफिक रज्जाक खान (वय ३६) हे सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय करतात. विविध सराफांकडून त्यांच्याकडे दागिने घडविण्यासाठी सोने दिले जाते. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते सव्वाआठच्या दरम्यान त्यांच्या पत्नी घराबाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडले. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले २ किलो २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे त्यांनी चोरून नेल्याची तक्रार आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची बारकाईने पाहणी सुरू केली. त्यामध्ये तक्रारदारांच्या घराखाली दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या घुटमळताना दिसल्या. पथकाने संशयितांची गोपनीय माहिती मिळवून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले. ते त्याच इमारतीत राहत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. आरोपींकडून चोरीतील संपूर्ण २ किलो २०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि बिस्किटे हस्तगत करण्यात आली. त्याशिवाय आणखी ४६ ग्रॅम सोनेही मिळाले. त्यामुळे या गुन्ह्यात चोरीच्या रकमेपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त झाल्याचे पोलिसांनी नमूद केले. सीसीटीव्हीतील हालचाली, स्थानिक माहिती आणि संशयितांच्या वास्तव्याची पडताळणी यांच्या आधारे तपासाला वेग मिळाला. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार,सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकात शर्मिला सुतार,राहुल मखरे,संतोष मोहिते,विनोद शिंदे,मयूर भोसले,अमित जमदाडे, हेमंत पेरणे, निलेश साबळे, विकास पांडोळे,सैफ नदाफ यांचा सहभाग होता.पथकाने तांत्रिक तपासासोबत गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटवली. त्यानंतर तातडीने चौकशी करून चोरीतील सोने हस्तगत करण्याची कारवाई पूर्ण केली, असे पोलिसांनी सांगितले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *