“मुंबईत मनसे आणि विरोधकांच्या स्वाक्षरी मोहिमेला तसेच मूक आंदोलनाला तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आम्ही थेट केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर आक्षेप नोंदवून त्यांन
.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देशपांडे यांनी भाजप नेत्यांची विधाने, वडाळा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे (RO) मनसेचा धडक मोर्चा, जंतरमंतरवरील आंदोलनांवर घातलेली बंदी, दुष्काळात व्हीआयपी गाड्यांसाठी सरकारने मंजूर केलेले कोट्यवधी रुपये आणि गरबामधील भाजपच्या अटींवर चौफेर टोलेबाजी केली.
ठाकरेंना वाकरे म्हणता, मग राणेंना काणे म्हणायचे का?
भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना देशपांडे म्हणाले, “भाजपकडे जनतेच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी कोणतेही तर्कशास्त्र उरलेले नाही. त्यामुळेच ते ‘ठाकरे-वाकरे’ अशी पोरकट यमक जुळवून वेळ मारून नेत आहेत. मग आम्हीही राणेंना ‘काणे’ म्हणायचे का? काहीतरी बोलायचे म्हणून बोलणाऱ्यांच्या वक्तव्यांना कोणताही अर्थ नसतो.”
आंदोलनाला जनतेचा मोठा पाठिंबा
“आंदोलनाला स्टंट म्हणणाऱ्या विरोधकांनी सांगावे की ते स्वतः काय भाकऱ्या भाजत आहेत का? देशातील लोकशाही पद्धतशीरपणे धोक्यात आणण्याचे काम भाजपचे सरकार करत असून, जनता आता या दडपशाहीविरोधात रस्त्यावर उतरत आहे.”

वडाळा RO कार्यालयावर आज धडक
मतदार यादीतील कथित गैरप्रकारांवर बोट ठेवत त्यांनी आक्रमक पवित्रा जाहीर केला. “निवडणूक आयोगाचा कारभार किती पक्षपाती आणि संशयास्पद आहे याचे ताजे उदाहरण म्हणजे, आमच्या मनसेच्या शाखाध्यक्षाचे नाव मतदार यादीतून परस्पर वगळण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांना चुकीच्या पद्धतीने पुन्हा नव्याने ‘फॉर्म 6’ भरण्यासाठी बळजबरी केली जात आहे.”
आजच जाब विचारणार
“या मनमानी कारभाराविरोधात जाब विचारण्यासाठी आज दुपारी 12.30 वाजता मनसेचे शिष्टमंडळ वडाळा येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या (RO) कार्यालयावर थेट धडक देणार आहे. मनसेचे पुढील आंदोलन कसे असेल, याची घोषणा आम्ही उद्या सकाळी करू.”
किचनमध्ये जेवायचे असते, टॉयलेट करायचे नसते
दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर आंदोलनाला बंदी घालून रामलीला किंवा बुराडी मैदानावर जाण्याचे फर्मान काढल्याच्या मुद्द्यावर देशपांडे यांनी खास शैलीत फटकारले. “प्रत्येक जागेचे एक विशिष्ट महत्त्व आणि इतिहास असतो. ऐतिहासिकदृष्ट्या आंदोलनाची जी जागा ठरलेली असते, तिथेच लोकशाही मार्गाने आवाज उठवला जातो. आता भाजपवाल्यांना जर कोणी सांगितले की, तुम्ही जिथे जेवण बनवता त्या किचनमध्ये जाऊन टॉयलेट करा, तर ते करतील का? स्वयंपाकघरात जेवण बनवायचे असते आणि टॉयलेटचे काम टॉयलेटमध्ये करायचे असते. लोकशाही आंदोलनांची जागा अशा प्रकारे हिरावून घेणे ही सरकारची अत्यंत विकृत आणि चुकीची भूमिका आहे.”
शेवटची 1-2 वर्षे उरलीत म्हणून मजा मारतायत
राज्यात दुष्काळ असताना महायुती सरकारने व्हीआयपींसाठी 12.68 कोटी रुपयांच्या आलिशान गाड्या खरेदी करण्यास दिलेल्या मंजुरीवरून त्यांनी सडकून टीका केली. “महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यावाचून आणि मदतीविना दुष्काळात होरपळतो आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा फीसाठी पैसे नाहीत. अशा भीषण परिस्थितीत हे सरकार व्हीआयपी पाहुण्यांच्या दिमतीसाठी तब्बल 12.68 कोटी रुपयांच्या नव्या गाड्या खरेदी करत आहे. जेव्हा एखाद्याला वाटते की आपली आता शेवटची एक-दोन वर्षेच सत्तेत उरली आहेत, तेव्हा जशी काही लोक मनसोक्त मजा मारून घेतात, तसाच हा प्रकार सुरू आहे.”
गाड्या विकत कशाला, भाड्याने घ्या
“पंतप्रधान मोदी तर आधीच मोठ्या आणि महागड्या गाड्यांमधून फिरतात. बाकी येणाऱ्या पाहुण्यांसाठी नवीन गाड्या विकत घेण्याची काय गरज आहे? त्या भाड्यानेही घेता येतात. जर सरकारला भाड्याने देणारे मिळत नसतील, तर मला सांगा; मी स्वतः त्यांना गाड्या भाड्याने उपलब्ध करून देतो. जनतेचा पैसा अशा ऐषोआरामावर उधळण्याऐवजी तो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर खर्च करा.”
आता फक्त खाकी चड्डीचा ड्रेस कोड जोडायचा बाकी
मालाड येथील गरबा महोत्सवात भाजप नेते विनोद शेलार यांच्या आयोजनात प्रवेशासाठी गोमूत्र मिश्रित कुंकू लावणे आणि सनातन धर्म मान्य करण्याची अट घातल्याच्या व्हिडिओवर देशपांडे यांनी खोचक टोला लगावला. “उत्सवात अशा अटी घालणाऱ्यांनी आता गरब्यासाठी एकच ड्रेस कोड जाहीर करायचा बाकी ठेवला आहे. त्यांनी सरळ सांगून टाकावे की, ‘खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट’ घालून आलात तरच गरब्याला प्रवेश मिळेल! तेवढी एकच अट त्यांनी नियमावलीत जोडून घ्यावी म्हणजे विषय संपेल,” असा उपरोधिक चिमटा काढत त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणावर निशाणा साधला. मुंबईतील 10 टक्के पाणीकपातीच्या काळात सुरू असलेल्या अनधिकृत नळ जोडण्यांवर महापालिकेने तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणीही संदीप देशपांडे यांनी शेवटी केली.
—————————————————————-
हेही वाचा…
काही जण परदेशी शक्तींचे बाहुले झालेत: कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस, राहुल गांधींच्या मोर्चावर एकनाथ शिंदेंची टीका

संविधान हातात घेत ते धोक्यात आहे, असे म्हणत ते कसे नष्ट होईल, हे काम काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून सुरू आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. दिल्लीत जी काही राजकीय आंदोलने झाली, ती काही साधी बाब नाही; हे देशासाठी घातक आहे. अनेक परकीय शक्ती देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. काही जण परदेशी शक्तींचे बाहुले झाले आहेत. हा सर्व आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचा भाग असल्याची शंका येत असून, देशाला अशांत करण्याचे आणि अराजकता माजवण्याचे कृत्य विरोधी पक्षाकडून सुरू आहे; जे अतिशय दुर्दैवी असून देशासाठी घातक आहे, असेही ते म्हणाले. येथे वाचा संपूर्ण बातमी