Headlines

राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन:पुणे-बेंगलोर महामार्ग ठप्प; आंदोलनास्थळीच जेवणाची व्यवस्था, महामार्गावर बसल्या पंगती




स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हजारो शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. तसेच महामार्गावर धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली असून रस्त्यावरच पंगती देखील बसवण्यात आल्या. कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या कोगनोळी टोल नाका तसेच कर्नाटक येथील हत्तरकी टोल नका येथे हजारो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्याने हा प्रमुख महामार्ग पूर्णपणे बंद झाला असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. शेतकरी नेत्यांची केंद्रासोबतची बैठक निष्फळ केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि शेतकरी नेत्यांमध्ये सोमवारी नवी दिल्लीत साखर आणि इथेनॉलच्या दराबाबत महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये साखरेचा किमान हमीभाव (MSP) 50 रुपये प्रतिकिलो करणे, सी-हेव्ही इथेनॉलचा दर 70 रुपये प्रतिलिटर करणे आणि साखर हंगाम लवकर सुरू केल्याबद्दल शेतकऱ्यांना प्रतिटन 500 रुपये अनुदान देणे या तीन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या होत्या. मात्र, या बैठकीतून कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निषेध नोंदवत महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर आरपारच्या लढाईची हाक दिली. आंदोलनामुळे पुणे-बेंगलोर महामार्गावर वाहतूक कोंडी राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्यावर धाव घेतली. आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, त्यामुळे पोलिसांनी त्वरित वाहतूक रोखून ती अंतर्गत ग्रामीण आणि पर्यायी मार्गांवर वळवली. सुरक्षेच्या कारणास्तव पुणे-बेंगलोर महामार्ग सध्या बंद ठेवण्यात आला असून, प्रशासनाने प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. महामार्गावरच शेतकऱ्यांचा मुक्काम; राजू शेट्टींचा सरकारला इशारा जोपर्यंत केंद्र सरकार मागण्यांचा लेखी निर्णय जाहीर करत नाही, तोपर्यंत महामार्ग एक इंचही मोकळा केला जाणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला असून, आंदोलक शेतकऱ्यांनी टोल नाक्यावरच मुक्काम ठोकण्याची तयारी केली आहे. कागल आणि निपाणी तालुक्यातील गावांमधून शेतकऱ्यांसाठी पिठलं-भाकरी गोळा करून सामूहिक जेवणाची व्यवस्था केली जात असल्याने, या आंदोलनाला आता एका मोठ्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *