Headlines

शरद पवारांना विश्वास, महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमताने जिंकतील:पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत परिवर्तनाची हाक; बालगंधर्व रंगमंदिरात मेळावा




पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार बहुमताने विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात राजकारणाची जाण आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता आहे. पुरोगामी विचारांचा वारसा त्या सक्षमपणे पुढे नेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बालगंधर्व रंगमंदिर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित मेळाव्यात शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. हर्षदा देशमुख-जाधव यांना गेल्या दहा-बारा वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणाचा अनुभव आहे. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यामुळे त्यांना समाजकारणाची ओढ निर्माण झाली. पदवीधरांचे प्रश्न त्या विधिमंडळात प्रभावीपणे मांडतील, असे पवार म्हणाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. देशातील आणि राज्यातील शिक्षणव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असून, भाजप सरकार केवळ दिवास्वप्ने दाखवत असल्याची टीका त्यांनी केली. हर्षदा देशमुख-जाधव या आदर्श आमदार म्हणून काम करतील, तर जयंत आसगावकर यांना आमदारकीचा अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले. जयंत पाटील यांनी भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचा दावा केला. सरकारविरोधी जनमत असून, सुशिक्षित मतदार महाविकास आघाडीला साथ देतील, असे ते म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ यांनी लोकशाहीसमोरील आव्हानांचा उल्लेख करत, पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याच्या प्रवृत्तीला मतदारांनी उत्तर द्यावे, असे आवाहन केले. शशिकांत शिंदे यांनी आंदोलन चिरडण्याच्या प्रवृत्तीवर टीका करत परिवर्तनाची गरज व्यक्त केली. तर हर्षवर्धन पाटील यांनी ही निवडणूक अस्तित्वाची असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. हर्षदा देशमुख-जाधव यांनी शिक्षणाला कौशल्याची जोड देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. गेल्या दीड-दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत असल्याचे सांगत, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या शिक्षणविषयक विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आमदार विश्वजीत कदम यांनीही मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क आणि सूक्ष्म नियोजनातून विजय साधण्याचे आवाहन केले. जयंत आसगावकर यांच्यासह अन्य नेत्यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *