![]()
पुणे शहरातील बाणेरमध्ये एका नियोजित गृहप्रकल्पाच्या 19 व्या मजल्यावरून पडून एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रागीब एहसान राकीब (वय 19, रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) असे मृत मजुराचे नाव आहे. त्याचा भाऊ मोहमद एहसान राकीब (वय 21, रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, 23 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास रागीब बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रस्त्यावरील गृहप्रकल्पात काम करत होता. स्लॅब टाकण्यासाठी लोखंडी पट्ट्या लावताना 19 व्या मजल्यावरून त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. या घटनेत रागीब गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक तपासणीत बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराने सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नव्हत्या, तसेच संरक्षक जाळीही योग्य पद्धतीने लावली नसल्याचे समोर आले. मजुराच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहायक पोलीस निरीक्षक एस. थिटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दुचाकीला पाठीमागून धडक सोलापूर-पुणे महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बारामती येथील एका 35 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक जखमीला मदत करण्याऐवाजी वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला. गौरीशंकर शिवराज सपळे (रा. बारामती) असे मयत तरुणाचे नाव आहे. शिवशंकर शिवराज सपळे (वय 38, रा. उस्मानाबाद) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. हा अपघात लोणी काळभोर येथील प्रगती मंगल कार्यालयासमोरील सार्वजनिक रस्त्यावर झाला. गौरीशंकर हे आपल्या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की गौरीशंकर यांच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालकाने रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करून हलगर्जीपणाने वाहन चालवल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Source link
पुण्यात 2 अपघातात 2 ठार:बाणेरमध्ये 19 व्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा, तर डंपरच्या धडकेत बारामतीच्या तरुणाचा मृत्यू