![]()
बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवर २० वर्षांपासून एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली एकहाती सत्ता अखेर संपुष्टात आली आहे. बुधवारी (दि. १४) पार पडलेल्या विशेष सभेत भाजपचे संचालक जयपाल बोदडे यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली.
.
सन २०२३ मध्ये झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १८ संचालकांपैकी १७ संचालक एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे, तर एकमेव संचालक म्हणून भाजपचे जयपाल बोदडे निवडून आले होते. बोदवड बाजार समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवडीनंतर जयपाल बोदडे व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
साडेतीन वर्षांच्या हुकूमशाहीला संचालक कंटाळले होते. सामान्य कार्यकर्त्याला सभापती होण्याचा मान मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. परिवारशाही आता मोडीत निघाली. -आमदार नंदू महाजन, विधान परिषद
मंत्री गिरीश महाजन यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायापालट करण्याचा आमचा प्रयत्न असेल. शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे, आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि कारभारात पारदर्शकता आणणे यास माझे प्राधान्य राहील, असा विश्वास नूतन सभापती जयपाल बोदडे यांनी व्यक्त केला. ^शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना व सर्व कामगारांना बोदवड बाजार समितीत आता खरा न्याय मिळेल. जयपाल बोदडे यांनी शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, त्यांना सरकार आणि माझ्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य लाभेल. -आमदार चंद्रकांत पाटील, मुक्ताईनगर अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक डी. व्ही. पाटील, एम. बी. गाढे आणि सचिव विशाल चौधरी यांनी कामकाज पाहिले. यावेळी आमदार नंदू महाजन, आमदार चंद्रकांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील, दूध संघ संचालक मधुकर राणे, प्रफुल्ल पाटील, अमोल देशमुख, मोहन महाजन, दुर्गेश पाटील आदी उपस्थित होते.