![]()
ग्रामीण महिलांना पूरक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी ग्रामीण उपजीविका प्रकल्पांतर्गत रविवारी अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे वाटप करण्यात आले. आरोळी सामाजिक संस्था, वणी रंभापूर यांच्या वतीने शेतकरी महिला, विधवा महिला, शेतमजूर व इतर गरजू महिलांना या उपक्रमाचा लाभ देण्यात आला. संस्थेच्या सीमा वानखडे व अर्चना गवई यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना कोंबड्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडावी आणि कुटुंबाला प्रथिनयुक्त सकस आहार मिळावा, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या संगोपनातून महिलांना नियमित पूरक उत्पन्न मिळण्यास मदत होणार असून, कुटुंबासाठी पोषणमूल्यांनी अंडीही उपलब्ध होतील. यामुळे ग्रामीण भागातील कुपोषण कमी करण्याच्या प्रयत्नांनाही हातभार लागणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांमध्ये बचतीची सवय, जबाबदारीची जाणीव आणि सामूहिक सहभागाची भावना विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच कुक्कुटपालन व्यवसायाला प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि संस्थेच्या माध्यमातून फिरता निधी उभारणे, हेही या प्रकल्पाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. उपलब्ध साधनसामग्रीचा उपयोग करत भविष्यात टप्प्याटप्प्याने नवीन लाभार्थी महिलांनाही या उपक्रमाचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
Source link
ग्रामीण उपजीविका प्रकल्प; महिलांना कोंबड्यांचे वाटप:आरोळी सामाजिक संस्थेचा पुढाकार