![]()
शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजारांची मदत मदत द्या, यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेस नेत्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेत बाळापूर येथे मोर्चा काढला. तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला. बाळापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे. शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी , २०२५-२६ मधील चालू कर्जासह संपूर्ण कर्ज माफ करावे, गतवर्षी व यावर्षीचे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी गोरक्षणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या जनावरामागे ५० रुपये दर दिवसाला अनुदान द्यावे, शेतमजूर व बेरोजगारांना १० हजार रुपये दुष्काळ अनुदान देऊन रोजगार हमी योजनांची कामे त्वरित सुरू करावी, या मागण्यांसाठी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी तथा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अशोक अमानकर यांचे नेतृत्वाखाली बाळापूर कचेरीवर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय अधिकारी संतोष येवलीकर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मोर्चात तालुक्यातील असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. शिवाजीराव म्हैसने, इजाज खान बुलंद खान, वाडेगावचे माजी सरपंच हिंमतराव घाटोळ, प्रमोद डोंगरे, संजय शेळके, मनोहर बचाटे, प्रा. दिनकर पाटील, डॉ. मोहम्मद फैयाज, मोहम्मद अकरम यांची भाषणे झाली. शासनाने मागण्याबाबत त्वरित विचार करून मागण्या त्वरित मंजूर कराव्यात मागण्या मंजूर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अशोक अमानकर यांनी दिला. सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन रमेश ठाकरे यांनी केले.
Source link
हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी:बाळापूर तहसील कार्यालयावर काँग्रेसच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांचा मोर्चा