Headlines

Malegaon Minor Rape-Murder Case Verdict: Accused Gets Death Penalty


डोंगराळे (ता. मालेगाव) येथे अवघ्या साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर पशूप्रमाणे अनन्वित लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम आरोपी विजय खैरनार (वय 24) याला मालेगाव येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने थेट फाशीची (मृत्युदंडाची) शिक्षा ठोठावल

.

अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयाने आरोपी विजय खैरनार याला लैंगिक अत्याचार, अपहरण, खून आणि पुरावा नष्ट करणे या चारही गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. याशिवाय पुरावा नष्ट केल्याप्रकरणी स्वतंत्र सात वर्षांची सक्तमजुरी ठोठावण्यात आली असून पीडित कुटुंबीयांना शासनाकडून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

प्रत्यक्षदर्शी नव्हता, पण परिस्थितीजन्य पुराव्यांनी आरोपीला घेरले

निकाल जाहीर झाल्यानंतर ज्येष्ठ विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या खटल्यातील तपासाचे आणि कायदेशीर लढ्याचे महत्त्वाचे पैलू उलगडून दाखवले. “या संपूर्ण घटनेत आरोपीला प्रत्यक्ष गुन्हा करताना पाहणारा कोणीही साक्षीदार नव्हता. पीडित चिमुरडी ही आरोपीबरोबर जात असताना दिसली होती; परंतु आरोपीचा दावा होता की त्याने तिला गावातील नेहरू पुतळ्याजवळ सोडून दिले होते. घटनास्थळावर कोणतेही सीसीटीव्ही फुटेज नव्हते. अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही परिस्थितीजन्य पुराव्यांची अभेद्य साखळी उभी केली आणि आरोपीचा बचाव न्यायालयासमोर पूर्णपणे खोडून काढला.”

चेहऱ्यावर पश्चात्तापाची पुसटशीही रेष नाही

“आरोपी 24 वर्षांचा तरुण असला तरी आपण केलेल्या अत्यंत घृणास्पद कृत्याची त्याला पूर्ण जाणीव होती. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर असतानाही त्याच्या डोळ्यांत व चेहऱ्यावर पश्चात्तापाची किंचितही भावना नव्हती. तुरुंग अधिकाऱ्यांचा अहवाल, परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांची माहिती आणि मानसोपचारतज्ज्ञांचे मत पाहता, ही प्रवृत्ती समाजासाठी अत्यंत घातक ठरेल हे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.”

अपिलाची मुभा

न्यायालयाच्या या निकालानंतर आरोपीला 30 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा असेल. तसेच कायद्यानुसार या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाची अंतिम मोहोर उमटणे आवश्यक असल्याने हे प्रकरण पुढील प्रक्रियेसाठी उच्च न्यायालयात वर्ग केले जाईल.

16 नोव्हेंबर 2025 ते 16 ऑक्टोबर 2026; अवघ्या 10 महिन्यांत 50 सुनावण्या!

डोंगराळे गावातील त्या काळ्या दिवसापासून ते आजच्या अंतिम निकालापर्यंतचा प्रवास अत्यंत वेगवान राहिला…

16 नोव्हेंबर 2025 रोजी मित्रांसोबत खेळत असणाऱ्या चिमुरडीला चॉकलेटचे आमिष दाखवून विजय खैरनारने फसवून नेले. गावातील लहान मुले आरोपीला ‘दादा’ म्हणून हाक मारत असत; त्याच विश्वासाचा त्याने घात केला. बालिकेवर पशूप्रमाणे अमानुष अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मोबाईल टॉवरच्या तारेच्या कुंपणात फेकून दिला.

रास्ता रोको आणि जनक्षोभ

या घटनेमुळे मालेगाव, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचा उद्रेक झाला होता. संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी रास्ता रोको करत नराधमाला फाशी देण्याची मागणी लावून धरली होती.

विशेष वकिलांची नियुक्ती

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मालेगावकरांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्या. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ॲड. उज्ज्वल निकम यांना हा खटला विशेष सरकारी वकील म्हणून चालवण्याची विनंती केली आणि सरकारने तत्काळ तसा आदेश काढला.

अथक परिश्रम

मालेगाव तालुका पोलीस, उपअधीक्षक यशवंत बाविस्कर, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, एपीआय प्रीती सावंजी, पीएसआय काळे, हेड कॉन्स्टेबल संतोष उगले, कॉन्स्टेबल संभाजी पीरनाईक या पोलीस पथकाने अवघ्या तीन आठवड्यांत भक्कम चार्जशीट दाखल केले. न्यायालयात सरकारी वकील ॲड. संजय सोनवणे, फिर्यादींचे वकील ॲड. ठाकरे, ॲड. तिवारी तसेच मालेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुधाकर निकम व सचिवांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत न्यायालयीन प्रक्रियेत मोलाचे सहकार्य केले.

16 ऑक्टोबरचा अनोखा योग; कसाब ते खैरनार!

या ऐतिहासिक निकालानंतर ॲड. उज्ज्वल निकम यांनी 16 ऑक्टोबरच्या तारखेचा एक खास उल्लेख केला.

“आज 16 ऑक्टोबर रोजी मालेगाव न्यायालयाने या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली. हा एक अनोखा योगायोग आहे की, 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाब याला ज्या पद्धतीने फासावर चढवले गेले, त्या खटल्यावर आधारित ‘प्रहार’ हा चित्रपटसुद्धा आजच्याच दिवशी प्रदर्शित होत आहे. आज पुन्हा एकदा कायद्याचा विजय झाला असून नराधमांना असाच धडा मिळेल,” असे ॲड. निकम म्हणाले.

पीडित कुटुंबाच्या अश्रूंचा बांध फुटला; मालेगावकरांकडून निकालाचे स्वागत

न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावताच गेल्या 10 महिन्यांपासून प्रत्येक सुनावणीला डोळ्यांत अश्रू घेऊन न्यायाची वाट पाहणाऱ्या पीडित कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. न्यायालयाने घोषित केलेली 10 लाखांची मदत पीडित कुटुंबाच्या दुःखाची भरपाई करू शकत नसली, तरी नराधम विजय खैरनारला फाशीची शिक्षा झाल्याने त्या चिमुरडीच्या आत्म्याला अखेर न्याय मिळाला आहे, अशी भावना मालेगावसह संपूर्ण महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे.

————————————————————————

हेही वाचा…

डोंगराळेतील ‘त्या’ चिमुरडीला अखेर न्याय: बालिकेवरील बलात्कार अन् खूनप्रकरणी नराधम विजय खैरनारला फाशीची शिक्षा; मालेगाव न्यायालयाचा निकाल

अवघ्या महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील अवघ्या साडेचार वर्षांच्या चिमुकल्या बालिकेवरील अमानुष लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खून खटल्यात न्यायालयाने अत्यंत कठोर व ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. मालेगाव अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने (फास्ट ट्रॅक कोर्ट) या विकृत गुन्ह्यातील दोषी नराधम आरोपी विजय ऊर्फ शेखर खैरनार (वय 24) याला थेट फाशीची (मृत्युदंडाची) शिक्षा ठोठावली आहे. या निकालाने संपूर्ण पीडित कुटुंबाला आणि न्यायासाठी आक्रोश करणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळाला असून, पीडितेच्या कुटुंबीयांना शासनाकडून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती ज्येष्ठ विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.