![]()
कुराश खेळाच्या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे खेळाडू आरक्षणातून पुणे शहर पोलिस दलात भरती झालेल्या 19 जणांना कायमचे सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. यापैकी नव्याने लागलेल्या दहा जणांना सेवेत रुजू करून घेण्यात आले नव्हते, तर नऊ जणांना विविध प्रशिक्षण केंद्रांत पाठविण्यात आले होते. त्यांनाही परत बोलावून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित उमेदवारांवर कायदेशीर कारवाईचीही शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाच्या खेळाडूंसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेत कुराश खेळाची बनावट प्रमाणपत्रे सादर करून या 19 जणांनी पोलिस दलात नोकरी मिळवली होती. एका व्यक्तीने याबाबत पोलिसांकडे तक्रार करून महत्त्वाची कागदपत्रे सादर केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत 2016 ते 2026 या कालावधीत प्रत्यक्षात स्पर्धा न घेता त्या झाल्याचे दाखवून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप समोर आला. संबंधित उमेदवार खेळाडू नसतानाही त्यांचे खेळाडू म्हणून अभिलेख तयार करून प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी गुन्हे शाखेने महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर, सचिव शिवाजी साळुंखे यांच्यासह चौघांना अटक केली आहे. त्यामध्ये क्रीडा प्रशिक्षण केंद्र चालविणारे श्रृती पुनगावकर आणि त्यांचे पती धैर्यशील पुनगावकर यांचा समावेश आहे. त्यांच्या केंद्रात बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त गोवर हसन, सहाय्यक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे. ..’ त्या’ 19 संघटना पोलिसांच्या रडारवर कुराश खेळाच्या तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या 19 संघटना आणि त्या चालविणाऱ्या व्यक्ती पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. गुन्हे शाखेने त्यांची माहिती संकलित केली असून, या प्रकरणातील तपासाच्या आधारे संबंधितांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
Source link
बनावट कुराश प्रमाणपत्रांमुळे पुण्यातील 19 पोलिसांची नोकरी जाणार:खेळाडू आरक्षणाचा गैरवापर केल्याने पोलिस आयुक्तांचा निर्णय; 4 जणांना अटक