Headlines

सुप्रीम कोर्टावर दबाव आणणे म्हणजे उघड देशद्रोह!:आनंद दुबेंच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका, पुण्यात सचिन सानपांना शिवसेनेचा पाठिंबा जाहीर




“देशाचे संविधान हातात घेऊन फिरणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीचे नेते प्रत्यक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त घटनात्मक संस्थांवर मोर्चे काढून दबाव आणत आहेत. भारतामध्ये बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळसारखी अराजकता व अशांतता पसरवून देशाला अस्थिर करण्याचे परकीय शक्तींचे हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. मात्र, हा नेपाळ किंवा श्रीलंका नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कणखर ‘नया भारत’ आहे. जनतेने तीन वेळा नाकारलेल्या विरोधकांचे हे देशविरोधी मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत,” असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्तरावर पक्षाची आक्रमक भूमिका मांडणारे प्रवक्ते आनंद दुबे यांच्यासह गुलाबचंद मौर्य, सुनील चौबे, ब्रिजेश मौर्य, दशरथ प्रजापती, प्रवीण दुबे, धनंजय गुप्ता आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नवरात्रीच्या मंगल पर्वावर शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. या वेळी युवासेना नेते राहुल कनाल यांच्यासह पक्षाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. इथे कोणी मालक नाही अन् नोकर नाही! आनंद दुबे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आनंद दुबे हे अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर पक्षाची भूमिका हिंमतीने मांडत आले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ‘नेशन फर्स्ट’ (राष्ट्र प्रथम) हा विचार घेऊन आम्ही काम करत आहोत. हा विचार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत. शिवसेनेत कोणी मालक नाही आणि कोणी नोकर नाही; मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो.” उत्तर प्रदेशात शिवसेनेचा विस्तार आनंद दुबे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रीय पातळीवर आणि विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढेल. संपूर्ण देशभरात पक्षाची विचारधारा आणि विकासाचे विचार पोहोचवण्यासाठी ही नवी टीम जोमाने काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यात सचिन सानपांना शिवसेनेचा पाठिंबा विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील लढतींवर भाष्य करताना एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण राजकीय घोषणा केली. “पुणे शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रा. सचिन सानप हे मुळात कट्टर शिवसैनिक आहेत. त्यामुळे शिवसेनेने त्यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत होत असली, तरी राज्यातील इतर चारही जागांवर महायुती पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने निवडणूक लढवत आहे.” पाचही जागा महायुती जिंकेल “महायुती सरकारच्या अडीच वर्षांतील कल्याणकारी योजना आणि विकासकामांच्या जोरावर पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पाचही जागांवर महायुतीचेच उमेदवार बहुमताने विजयी होतील,” असा ठाम दावा त्यांनी केला. सुप्रीम कोर्टावर चाल करून जाणे लोकशाहीचा खून दिल्लीतील विरोधकांची आंदोलने आणि निवडणूक आयोगाविरोधातील भूमिकेवरून राहुल गांधींवर निशाणा साधताना शिंदे अत्यंत आक्रमक झाले. “देशाच्या इतिहासात कधी नव्हे ते सर्वोच्च न्यायालयावर मोर्चे नेणे, न्यायाधीशांवर दबाव आणणे आणि थेट पंतप्रधानांच्या घरासमोर निदर्शने करून अराजकता पसरवण्याचे काम विरोधक करत आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही विरोधकांना फटकारत ‘अशा दबावाला न्यायालय बळी पडणार नाही’ हे ठणकावून सांगितले आहे. घटनात्मक संस्थांना बदनाम करून जनतेमध्ये अविश्वास निर्माण करणे ही गोबेल्स नीती आहे.” पाकिस्तानच्या मीडियात विरोधकांच्या हेडलाईन्स का? “‘सत्तेत आम्ही बसू अन्यथा देश उद्ध्वस्त करू’ ही विरोधकांची विकृत मानसिकता आहे. विरोधकांच्या या विधानांच्या आणि आंदोलनांच्या हेडलाईन्स थेट पाकिस्तानात झळकत आहेत. पाकिस्तानला जे हवे आहे, तीच भाषा विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलत असतील, तर हा थेट देशद्रोहच आहे. सत्ता गेली म्हणून ‘पाण्याविना मासा’ तडफडतो तशी विरोधकांची अवस्था झाली आहे,” असा घणाघात त्यांनी केला. भारत जागतिक महासत्तेकडे; विकासाने विरोधकांच्या पोटात दुखतेय! देशाच्या प्रगतीचा पाढा वाचताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे. 2014 पूर्वी जगात ‘नाजूक पाच’ देशांमध्ये मोडणारा भारत आज जगातील टॉप 5 अर्थव्यवस्थांमध्ये पोहोचला असून लवकरच तिसऱ्या स्थानावर झेप घेणार आहे. महाराष्ट्रातही परदेशी गुंतवणुकीचा ओघ सुरू असून राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे.” जनता विरोधकांना पुन्हा धडा शिकवेल विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला आणि देश तोडणाऱ्या अपप्रचाराला सुजाण नागरिक कधीही बळी पडणार नाहीत. यापूर्वी तीन वेळा विरोधकांना पराभवाची धूळ चारणाऱ्या देशातील १४० कोटी जनतेचा विश्वास मोदींच्या पाठीशी असून येणाऱ्या काळातही जनता अशा प्रवृत्तींना कायमचा धडा शिकवेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटी व्यक्त केला. ——————————————————- हेही वाचा… अखेर मनातलं ओठांवर आलंच… हा सगळा खेळ सत्तेसाठी!: प्रशांत भूषण यांचा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात दिल्लीतील इंडिया आघाडीशी संबंधित आंदोलनावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी पत्रकार परिषदेत सत्तांतराची गरज असल्याचे विधान केल्याचा व्हिडीओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केला. या विधानाच्या आधारे त्यांनी आंदोलनाच्या उद्देशावर प्रश्न उपस्थित करत विरोधकांवर निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सुरू झालेल्या आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *