Headlines

महिलांमध्ये हार्मोन्स बदलांमुळे सांधेदुखीचा त्रास:रजोनिवृत्तीनंतर हाडांची घनता कमी होते; लक्षणांकडे दुर्लक्ष नको, डॉ. सुजित काडरेकर यांचा सल्ला




मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती या महिलांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर शरीरातील हार्मोन्सच्या पातळीत बदल होतात. या बदलांचा परिणाम हाडांचे आरोग्य, सांधे आणि शरीरातील सूजेवर होऊ शकतो. त्यामुळे काही महिलांना सांधेदुखी, सांधे आखडणे आणि स्नायू दुखण्याचा त्रास जाणवतो. मात्र, प्रत्येक सांधेदुखीचे कारण हार्मोन्समधील बदल नसून, त्यामागे संधिवात किंवा इतर आजारही असू शकतात. त्यामुळे सततच्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन हाडे व सांध्यांचे तज्ज्ञ डॉ. सुजित काडरेकर यांनी केले. डॉ. काडरेकर म्हणाले, इस्ट्रोजेन हा हार्मोन हाडांची ताकद टिकवून ठेवण्यास आणि शरीरातील सूजेचे नियंत्रण करण्यास मदत करतो. मासिक पाळीदरम्यान या हार्मोनच्या पातळीत होणारे बदल काही महिलांमध्ये सांध्यांची अस्वस्थता वाढवू शकतात. गर्भधारणेदरम्यान वजन वाढल्याने कंबर, नितंब आणि गुडघ्यांवर अतिरिक्त ताण येतो. तर रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे हाडांची घनता घटण्याचा धोका वाढतो. परिणामी, काही महिलांना सांधेदुखी आणि स्नायू दुखण्याचा त्रास होऊ शकतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये रुमेटॉइड आर्थरायटिस होण्याचे प्रमाण अधिक आहे. या आजारात रोगप्रतिकारक शक्ती सांध्यांच्या आतील आवरणावर हल्ला करते. त्यामुळे सूज, वेदना आणि सांध्यांची हालचाल करताना अडचणी निर्माण होतात. याशिवाय ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये सांध्यांतील कार्टिलेजची झीज होते. रजोनिवृत्तीनंतर ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही वाढतो. मात्र, ऑस्टिओपोरोसिस आणि संधिवात हे वेगवेगळे आजार आहेत. सांध्यांच्या आरोग्यासाठी नियमित चालणे, स्नायू बळकट करणारे व्यायाम, वजन नियंत्रण आणि प्रथिने, कॅल्शियम व ‘ड’ जीवनसत्त्वयुक्त संतुलित आहार महत्त्वाचा आहे. सांध्यांना सूज येणे, सकाळी दीर्घकाळ आखडल्यासारखे वाटणे किंवा दैनंदिन कामांत अडचण येणे अशी लक्षणे दिसल्यास तपासणी करून घ्यावी. लवकर निदान झाल्यास योग्य उपचार वेळेत सुरू करता येतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *