![]()
ठाण्यातील आनंद नगर–साकेत उन्नत मार्ग प्रकल्पाच्या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे. कोपरी पुलावरून जात असलेल्या एका कारवर बांधकाम सुरू असलेल्या खांबाचा लोखंडी सळ्यांचा सांगाडा (रिइन्फोर्समेंट केज) कोसळल्याने कारच्या पुढील काचेचे नुकसान झाले. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. अशा घटना कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. नुकसानग्रस्त वाहन घटनास्थळावरून हटविण्यात आले असून, कोसळलेला लोखंडी सांगाडा क्रेनच्या साहाय्याने सुरक्षितपणे हटविण्याचे काम सुरू आहे. मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक मुंबई-नाशिक महामार्गावर खोळंबू नये, या उद्देशाने सध्या कोपरी उड्डाणपूल ते साकेत दरम्यान ‘आनंदनगर-साकेत उन्नत मार्गा’चे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पांतर्गत कोपरी उड्डाणपुलापासून तीन हात नाका वाहतूक कार्यालय ते फ्लॉवर व्हॅली सेवा रस्त्यापर्यंत बॅरिकेड्स लावून काम सुरू असून, पुढे हा मार्ग मुंबई-नाशिक महामार्गाला समांतरपणे साकेतच्या दिशेने उभारला जात आहे. मात्र, याच प्रकल्पाच्या कामादरम्यान यापूर्वी कोपरी उड्डाणपुलावर एक महाकाय क्रेन कलंडल्याची घटना घडली होती. ज्यामुळे ऐन संध्याकाळच्या वर्दळीच्या वेळी ठाण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आनंदनगर-साकेत उन्नत मार्गाच्या कामाच्या ठिकाणी यापूर्वी 50 टनांहून अधिक वजनाची क्रेन कलंडल्याची घटना घडली होती, ज्याला हटवण्यासाठी पर्यायी क्रेनची मदत घ्यावी लागली होती आणि आता पिलर उभारणीसाठी लावलेले लोखंडी स्ट्रक्चर थेट धावत्या वाहनावर कोसळल्याने, या वर्दळीच्या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. सलग घडणाऱ्या या दुर्घटना अत्यंत चिंताजनक असून, त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेची, स्ट्रक्चरच्या स्थिरतेची आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या काटेकोर अंमलबजावणीची तातडीने सखोल तपासणी करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. MMRDA कडून कंत्राटदारावर 2 कोटींचा दंड या घटनेप्रकरणी एमएमआरडीएने प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, घटनेचे नेमके कारण आणि सुरक्षाविषयक त्रुटींचा शोध घेण्यासाठी सखोल चौकशीचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सुधारात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. नागरिकांची सुरक्षितता ही एमएमआरडीएची सर्वोच्च प्राथमिकता असून, प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन आणि जबाबदारी निश्चित केली जाईल.
Source link
ठाण्यात पुलाचा सांगाडा कारवर कोसळला:कंत्राटदाराला 2 कोटींचा दंड; आनंद नगर-साकेत उन्नत मार्गावरील धक्कादायक घटना