![]()
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे, कागदपत्रांची जुळवाजुळव आणि पात्रतेच्या याद्यांमधील नोंदी यांसाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि माहितीवर आधारित करण्यासाठी पुण्यातील शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट लिमिटेडने (एससीपीएल) डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांची जमीन, पिके, पेरणी, उत्पादन, खर्च आणि नुकसानीसंबंधी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे याचा सगळ्यात जास्त फायदा हा नुकसानभरपाई आणि विम्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक पुरावे संकलित करण्यासाठी होणार आहे. शेअर क्रॉपर्सच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत संस्थापिका कृष्णा भट, सुधा ज्योती, संजय खत्री यांनी या उपक्रमाची माहिती दिली. कृष्णा भट म्हणाल्या, “प्रत्येक नैसर्गिक आपत्तीनंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती गोळा करणे, पंचनामे करणे, कागदपत्रांची पडताळणी आणि पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार करणे, अशा अनेक टप्प्यांतून जावे लागते. अनेकदा शेतकऱ्यांना आपल्या नावाची नोंद झाली आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये बऱ्याच फेऱ्या माराव्या लागतात. पण ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीविषयक नोंदींचे डिजिटल स्वरूपात एकत्रीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. या प्रणालीमध्ये शेतजमीन, प्लॉट, पेरणी, पीकनिहाय माहिती, बियाणे व खतांची खरेदी, मजुरी, फवारणी, यंत्रसामग्री, सिंचन, उत्पादन, विक्री तसेच नफा-तोटा यांची सोप्या पद्धतीने नोंद ठेवता येणार आहे. त्यामुळे शेतीसंबंधी विविध माहिती आणि कागदपत्रे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याऐवजी ती एकाच डिजिटल व्यवस्थेत उपलब्ध होतील. या माहितीच्या आधारे शेतीचा खर्च कमी करणे, कर्ज किंवा विम्याची प्रक्रिया सुलभ करणे आणि सगळ्यात महत्त्वाचे पीक व्यवस्थापनाबाबत अधिक अचूक निर्णय घेणे शक्य होणार आहे.” संजय खत्री म्हणाले, “या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात तीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये ‘स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प पोर्टल’ हे शेतकरी, शेतकरी मित्र, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), संस्था आणि सेवा भागीदारांना जोडणारे केंद्रीय व्यासपीठ असेल. ‘खेत नायक’ या मोबाइल ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीची स्थिती, खर्च, उत्पादन आणि विविध सेवांची माहिती पाहता येईल.
Source link
शेतकऱ्यांचा डेटा एका क्लिकवर; नुकसानभरपाई, विम्याची प्रक्रिया होणार सोपी:शेअर क्रॉपर्सने विकसित केले तीन डिजिटल प्लॅटफॉर्म, 19 ला लोकार्पण; एफपीओना 5 ट्रॅक्टर मिळणार